सातारा : जिल्ह्यातील डेअर्या आणि दूध थंड करण्यासाठी सुरू केलेल्या कुलर पॉईंटमध्ये दूध भेसळीचा बाजार भरला आहे. दूध डेअर्या आणि दूध संघ यांच्यामध्ये निर्माण झालेली कुलर पॉईंटच्या साखळीमुळे भेसळीला खतपाणी मिळत आहे. जिल्ह्यात अनेक बोगस कुलर पॉईंट असल्याची माहिती असून अनेकांच्या परवान्यांचे नुतनीकरणही झालेले नाही. अशा दूध कुलर पॉईंट चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हावासियांतून होत आहे.
दुधाच्या कुलरची ही व्यवस्था गुणवत्ता टिकवण्यासाठी असली तरी प्रत्यक्षात कुलर पॉईंटच भेसळीचा अड्डा बनले आहेत. डेअरीनंतर कुलर पॉईंट हा भेसळीचा आणखी एक टप्पा बनला आहे का? हा प्रश्न आहे. तांत्रिकदृष्ट्या पाहता, डेअर्यांच्या माध्यमातून दूध संकलन केल्यानंतर ते लवकर थंड न केल्यास गरम हवामानात त्यामध्ये बॅक्टेरिया वाढून ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे डेअरी व दूध संघ यामधील अंतर जास्त असल्यास कुलर प्लांटची मदत होते. मात्र, दूध वितरणात ही मधली साखळी जितकी वाढते, तितकी दुधात भेसळ करणारे हात वाढतात. प्रत्येकाच्या हाताजवळ भेसळीची संधी उपलब्ध होते.
कुलर पॉईंटरवर दूध काही काळ साठवले जात असताना याच ठिकाणी भेसळीचा बाजार सुरू होतो. डेअरीवर आधीच पाणी व इतर रसायने मिसळून आलेले दूध कुलर पॉईंटवर भेसळ करून 'सेट' केले जाते. वेगवेगळ्या डेअर्यांमधून आलेले हलक्या व चांगल्या दर्जाचे दूध एकत्र मिसळून सरासरी गुणवत्ता साधली जाते. थंड साठवणुकीत दूध फाटू नये किंवा आम्लयुक्त होऊ नये यासाठी त्यामध्ये सोडा किंवा इतर स्टॅबिलायझर्स मिसळले जात असल्याची चर्चा त्याठिकाणी काम करणार्या कामगारांमध्ये आहे.
कुलर पॉईंटवर दुधाचे वजन व प्रमाण नोंदवले जाते. या नोंदीमध्येही फेरफार करून, कमी दर्जाचे दूध जास्त प्रमाणात दाखवण्याचे प्रकार होतात. ही तफावत भरून काढण्यासाठी पाणी किंवा इतर रासायनिक पदार्थ मिसळले जातात. कुलर पॉईंटमधील दूध साठवण्याच्या टाक्या व पाईपलाईन्स दररोज स्वच्छ न केल्यास, उरलेल्या जुन्या दुधातील बॅक्टेरिया नव्या दुधात मिसळतात आणि यावर पांघरून घालण्यासाठी कुलरचालक पुन्हा रसायनांचा वापर करतात
दूध डेअर्यांप्रमाणेच कुलर पॉईंटवरही दररोज दुधाची गुणवत्ता तपासणी होते का? याबाबत शंका आहे. दूध योग्य तापमाणाला थंड झाले की नाही, याच्या नोंदी प्रत्यक्ष तपासल्या जातात का? हा प्रश्नच आहे. अनेक कुलर पॉईंटरवर तांत्रिक तपासणीसाठी आवश्यक कुशल कर्मचारी उपलब्ध आहेत का? याची तपासणीही अन्न व औषध प्रशासनाने करणे आवश्यक आहे.
कुलर पॉईंटवरील भेसळ अंतिम टप्प्यातील असल्याने तिची व्याप्ती मोठी असते. दूध डेअर्या तसेच कुलर पॉईंटवर भेसळ केल्यानंतर लोकांना दूध मिळते. त्यामुळे आरोग्याला प्रचंड धोका निर्माण होतो. प्रत्येक कुलर पॉईंटवर स्वतंत्र गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा बंधनकारक करणे आवश्यक आहे. दूध साठवणूक टाक्यांच्या स्वच्छतेचे नियमित ऑडिट झाले पाहिजे. तापमान व गुणवत्ता नोंदींसाठी डिजिटल तसेच छेडछाड विरोधी प्रणाली कुलर पॉईंटवर बसवणे सक्तीचे करावे, अशी मागणी जिल्हावासियांतून होत आहे.
दूध डेअर्यांपासून सुरू झालेला भेसळीचा प्रवास कुलर पॉईंटपर्यंत पोहोचून आणखी क्लिष्ट बनतो. दूधाची गुणवत्ता टिकवण्यासाठी उभारलेल्या या यंत्रणेत जर पारदर्शकतेचा अभाव असेल तर अशा यंत्रणेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. अन्न व औषध प्रशासनाने प्रत्येक कुलर पॉईंटची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.