सातारा : शौर्य, त्याग आणि देशसेवेची परंपरा रक्तात भिनलेल्या सातारा जिल्ह्याच्या सैनिकी वारशाला रविवारी आणखी एक अभिमानाचे पान जोडले गेले. सिकंदराबाद येथून भारतीय सेनादलाचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून जिल्ह्यातील ३६ युवक अग्निवीर म्हणून मायभूमीत दाखल झाले. या जवानांचे माजी सैनिक संघटना, सैनिक फेडरेशन आणि नागरिकांच्यावतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. फुलांचा वर्षाव आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी सातारा शहराचा परिसर दुमदुमून गेला.
सातारा जिल्ह्याची ओळखच मुळात सैनिकी जिल्हा म्हणून आहे. जिल्ह्यातील असंख्य कुटुंबांमध्ये सैनिकी सेवेची परंपरा आजही अभिमानाने जपली जाते. देशाच्या सीमेवर शौर्य गाजवणाऱ्या या भूमीने अनेक वीर जवान देशाला दिले आहेत. याच गौरवशाली परंपरेचा वारसा पुढे नेत अवघ्या २० ते २२ वर्षांच्या या ३६ तरुणांनी भारतीय सेनादलात दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
खडतर शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे जवान रविवारी साताऱ्यात दाखल झाले. आपल्या भूमीत परतलेल्या या जवानांच्या स्वागतासाठी माजी सैनिकांसह नागरिक उपस्थित होते. जवानांचे आगमन होताच घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. फुलांचा वर्षाव करत आणि भारतमातेचा जयघोष करत त्यांचे स्वागत करण्यात आले. शिवतीर्थ पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या जवानांनी देशसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली.
छत्रपती शिवरायांच्या शौर्य, स्वराज्य आणि राष्ट्रनिष्ठेच्या भूमीत उभे राहून या तरुणांनी सैनिकी परंपरेला जणू सलामच केला. शिवरायांच्या पराक्रमाची प्रेरणा आणि साताऱ्याच्या सैनिकी वारशाचा अभिमान घेऊन भारतीय सेनादलात सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या जवानांचे दिमाखदार स्वागत उपस्थितांसाठी अभिमानाचा क्षण ठरला.