सातारा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यात शुक्रवारी उरमोडीच्या फार्महाऊसवर झालेल्या बैठकीत दोन्ही राजे आपलाच समर्थक नगराध्यक्ष व्हावा यावर अडून राहिले. दोन्ही बाजूला तगडी नावे असल्याने नगराध्यक्षपदाच्या निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलण्यात आला आहे. झालेल्या बैठकीत जास्तीत जास्त तरुण व नवे चेहरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर दोन्ही बाजूंचे वादग्रस्त चेहरे नगरपालिकेत न देण्यावर एकमत झाले.
शुक्रवारी पुन्हा यादीवर हात फिरवला जाणार असून दोन्ही राजे सोमवारीच भाजपच्या उमेदवारांना एकत्रित अर्ज दाखल करायला लावतील. साताऱ्यात नगराध्यक्षपद व नगरसेवकांच्या यादीबाबत उरमोडीच्या फार्महाऊसवर बैठक झाली. या बैठकीत इलेक्टीव्ह मेरीटवर चर्चा झाली. माझा की तुझा हे न पाहता निवडून येणारा उमेदवार आपला असावा, यावर दोन्ही राजेंनी चर्चा केली. प्रत्येक प्रभागात 2 उमेदवार काढण्यात आले. अंतिम यादी दोन्ही राजेंनी निश्चित करण्याचे ठरले.
नगराध्यक्षपद कोणत्या आघाडीकडे द्यायचे आणि उमेदवार कोणाचा असावा, यावरून या दोन्ही राजेंमध्ये चर्चा झाली. तुमच्याकडे पाच वर्षे नगराध्यक्षपद होते. आता माझ्याकडे नगराध्यक्षपद दिले तर मलाही कामकाजाला सोपे जाईल. होणारा नगराध्यक्ष आपलाच असेल, अशी भूमिका शिवेंद्रराजेंनी मांडल्याचे समजते. तर मंत्रीपद तुमच्याकडे असल्यामुळे नगराध्यक्षपद आमच्याकडे असू द्या, आपल्या दोघांच्या विचाराचा नगराध्यक्ष करु अशी भूमिका खा. उदयनराजेंनी मांडल्याचे समजते. दोघेही नगराध्यक्षपदावर अडून राहिल्याने शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेवू देत, असे ठरवण्यात आले.
त्यानंतर दोन्ही राजे बैठकीतून उठले. ॲड. डी. जी. बनकर, सुनील काटकर, अविनाश कदम व अमोल मोहिते हे त्यानंतर साताऱ्यातील एका हॉटेलवर एकत्रित बसले. दोन्ही राजेंनी सांगितलेल्या सूचनांनुसार प्रत्येक प्रभागातील नं. 1 व नं. 2 चे उमेदवार निश्चित करण्यात आले.
दोन्ही राजेंनी बैठकीत नव्या व तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. तर ज्यांच्यामुळे नगरपालिकेची बदनामी होईल, असे चेहरे नकोत यावर दोन्ही राजेंचे एकमत झाले. शनिवारी पुन्हा एकदा बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीत यादीवर अंतिम हात फिरवला जाणार आहे. सोमवारी नगराध्यक्षपदासह भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज भरले जातील.