सातारा : साताऱ्याच्या नगराध्यक्ष पदासाठी जोर बैठकांना ऊत आला असून, साताऱ्याचा नगराध्यक्ष होण्यासाठी अनेकांनी लॉबिंग सुरू केले आहे. काहीजण दोन्ही महाराज म्हणतील तसं. तर काहीजण आमचे ‘महाराज म्हणतील तसं’ असे बोलू लागले आहेत. काहींनी मात्र सर्वत्र लॉबिंग केले असून, त्यांचे सोशल मीडियावरही ठसे उमटू लागले आहेत. काहींनी पक्षीय पातळीवर वरिष्ठांमार्फत संधान साधायला सुरुवात केली असतानाच काहींनी जलमंदिर व सुरुचिवरच्या चकरा वाढवल्या आहेत.
सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्यानंतर शहरात इच्छुकांकडून लॉबिंग सुरू झाले आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याने सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीमध्ये हलकल्लोळ माजला आहे. नगराध्यक्ष म्हणून सातारकरांची पसंती कुणाला यावर साताऱ्यात ‘नॉन पॉलिटिकल सर्व्हे’ सुरू झाला आहे. त्यामुळे सोशल प्लॅटफॉर्मवर नगराध्यक्षपदासाठी रणांगण सुरू झाल्याचे चित्र आहे.
सातारा पालिका निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. नगराध्यक्ष आरक्षण सोडतीनंतर प्रभाग रचना आणि त्याची आरक्षण सोडत जाहीर झाली. मतदार यादी कार्यक्रम काही दिवसांतच पूर्ण होणार असून लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि नगर विकास आघाडीचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या राजकीय भूमिकांवर सातारकांचे लक्ष खिळले आहे. नगराध्यक्षपदासाठी कोणत्या गटाला संधी मिळणार आणि त्या गटाचा चेहरा कोण असणार, जनतेच्या मनातील नगराध्यक्ष हाच सातारकरांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सर्व्हे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सातारा शहरासाठी योग्य नगराध्यक्ष कोण? या प्रश्नावर आधारित हे सर्व्हे असल्याने अशा सर्व्हेंमुळे साताऱ्याचे राजकारण पेटले आहे. साताऱ्यातील नागरिकांच्या प्रतिक्रियांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, राजकारण नव्हे, विकास हवा आहे. नगराध्यक्ष कोणत्याही आघाडीचा असो पण त्याने पाणी, रस्ते, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी नागरी प्रश्न सोडवावेत, ही सर्वांची अपेक्षा आहे.
साताऱ्यात राजकीय वर्तुळात सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. साताऱ्याचे राजकारण अनेकदा ‘राजे विरूद्ध राजे’ अशा संघर्षावर होते; परंतु दोघांचे संबंध अलीकडे सौहार्दपूर्ण राहिले असल्याने ‘राजे विरूद्ध राजे’ ऐवजी ‘राजे विरूद्ध अन्य’ अशी शक्यता काहीजण व्यक्त करत आहेत. उदयनराजेंना असलेला ऐतिहासिक जनाधार, त्यांच्या सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून झालेली विकासकामे यामुळे अनेक कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. तर शिवेंद्रराजे हे मंत्रिपदावर असल्याने प्रशासनिक अनुभव तसेच प्रभागांसह शहर विकास आराखड्याशी संबंधित राबवलेले प्रकल्प ही त्यांच्या जमेची बाजू आहे. त्यामुळे दोन्हीही राजे आपापल्या आघाड्यांसाठी ‘विजयी चेहरा’ शोधत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सातारा नगरपालिकेच्या राजकारणात सत्तेत येणाऱ्या आघाड्या वारंवार बदलल्या आहेत. दोन्ही राजांचे मनोमीलन तर कधी संघर्ष असे चित्र राहिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्या आघाडीतून कोणता उमेदवार उभा राहतो आणि त्याला उमेदवाराला कोणत्या आघाडीचा पाठिंबा मिळतो? मनोमीलन न झाल्यास दोन्ही आघाड्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण असतील, हे पाहणे निर्णायक ठरणार आहे. साताऱ्याच्या शहरी मतदारसंघात पारंपरिक घराणी, व्यापारी वर्ग, शैक्षणिक संस्था, समाजघटक आणि नवमतदार हे सर्वच मतदार राजकारणातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे ज्याला या सर्व स्तरांमध्ये समन्वय साधता येईल, शहराचा चेहर उजळवता येईल आणि सर्वात महत्त्वाचे दोन्ही राजांच्या विश्वासास पात्र असेल, असा उमेदवार दोन्ही आघाड्या शोधत असल्याची माहिती आहे.