मसूर : मसूरच्या मुख्य चौकासह प्रमुख रस्त्यांवरील व्यापारी प्रतिष्ठानांना चोरट्यांनी लक्ष्य करत एका रात्रीत अक्षरशः धुमाकूळ घातला. शुक्रवारी मध्यरात्री कराड, शामगाव व किवळ रस्त्यांवरील नऊ दुकानांचे शटर फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये सुमारे ७२ हजार रुपयांची रोकड आणि साहित्य चोरीला गेले. विशेष म्हणजे, चोरट्यांनी दुकानांबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केली.
कराड-मसूर रस्त्यावरील संजय चव्हाण यांच्या श्री कलेक्शनमधून ५३ हजार रुपये, मोमीन पतंजली आयुर्वेदिक दुकानातून १२०० रुपये, निगडीकर किराणा दुकानातून १० ते १५ हजार रुपये, लक्ष्मी किराणा स्टोअर्समधून ५०० रुपयांची चिल्लर, जगदाळे यांच्या दारू दुकानातून १० हजार रुपये, तर जहांगीर शेख यांच्या पानटपरीतून ५०० रुपये व सिगारेटची पाकिटे चोरट्यांनी लंपास केली.
अन्य दुकानांचे कुलूप व कोयंडे तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. या घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा शोध घेत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा स्थानिकांसह व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.
श्वान, ठसे तज्ज्ञ दाखल; सीसीटीव्हीत चोरटे कैद...
घटनेची माहिती मिळताच मसूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. परिसरातील काही दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे दिसून आल्याची माहिती आहे. उपलब्ध फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. काही ठिकाणी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्याचाही प्रयत्न केला.
पाेलिसांच्या रात्र गस्तीबाबत प्रश्नचिन्ह
मसूरचा मुख्य चौक हा व्यापारी वर्दळीचा परिसर आहे. यापूर्वी या भागात रात्रीच्या वेळी पोलिसांची नियमित गस्त असायची. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रात्र गस्तीला पोलीस दिसत नसल्याची चर्चा नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये आहे. अशा वर्दळीच्या ठिकाणी एकाच रात्री नऊ दुकानांचे शटर फोडले गेल्याने खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या रात्र गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.