सातारा : सातार्यातील सेव्हन स्टार इमारतीसमोरील भाजी मंडईत मोबाईल चोरुन पळणार्या चोरट्याला नागरिकांनी तांगडत चोप दिला. संशयिताला रंगेहाथ मोबाईल चोरी केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, संशयित परप्रांतीय अल्पवयीन असून त्याच्या विरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रणजित विजयराव मोहिते (वय ४३, रा. राधिका रोड, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयित मुलगा हा अल्पवयीन असून त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी सकाळी ८ वाजता ही घटना घडली आहे. रणजित मोहिते हे भाजी खरेदी करण्यासाठी भाजी मंडईत गेले होते.
भाजी खरेदीमध्ये ते गुंतले असल्याचे पाहून एका युवकला अलगद त्यांच्या खिशातील मोबाईल काढला. मोबाईल चोरुन संशयित तेथून निघून जात असताना ही बाब रणजित मोहिते यांच्या लक्षात आली. त्या युवकाचा पाठलाग करुन त्याला पकडले. मंडईत पळापळ झाल्याने नागरिक सतर्क झाले. संशयिताकडे मोबाईलबाबत विचारताच त्याने खिशातून मोबाईल काढून दिला.
जमाव संतप्त बनल्याने तणाव
.मंडईत मोबाईल चोरीची घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी संशयिताला झेंझाडत चोप देण्यास सुरुवात केली. अचानक या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. दर रविवारी मंडईत मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र त्यावर पोलिसांकडून कमी प्रमाणात प्रतिबंध झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये चीड आहे. अखेर तक्रारदार यांनीच संशयिताला वाचवत तात्काळ पोलिसांना बोलावले. पोलिस येताच त्याचा ताबा देण्यात आला. दरम्यान, संशयितांची टोळी असण्याची शक्यता असून पोलिसांच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.