Jaykumar Gore 
सातारा

Satara News : माणच्या ३७ गावांसाठी तीन सिंचन योजनांना मंजुरी

उत्तर, पश्चिम व शिरवली माणसाठी ३९० कोटी : हजारो हेक्टर क्षेत्राला मिळणार संजीवनी

पुढारी वृत्तसेवा
राजेश इनामदार

दहिवडी : माण तालुक्यातील दुष्काळी गावांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तीन महत्त्वपूर्ण उपसा सिंचन योजनांना मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यातून उत्तर माण, पश्चिम माण व शिरवली माण या तीन योजनांसाठी सुमारे ६९० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या योजनांचा लाभ तालुक्यातील ३७ गावांना होणार असून हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. निविदा प्रक्रिया पार पडली असून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे.

गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे-कठापूर) अंतर्गत या योजनांचा समावेश आहे. शासनाच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार कृष्णा नदीतून खरीप हंगामात ६.३३२ अब्ज घनफूट पाणी उचलून दुष्काळी भागाला उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

उत्तर माण उपसा सिंचन योजना : आंधळी धरणाच्या डाव्या तीरावरून पाणी उचलण्यात येणार असून ७.२३ किलोमीटर उर्ध्वगामी नलिकेद्वारे ८ हजार ६९४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. खुंटबाव, कारखेल, शिखर-शिंगणापूर, वावरहिरे, लक्ष्मीनगर, तोंडले, जाधववाडी, राजवडी, मोरगाळे, बिजवडी, पांगरी, टाकेवाडी, पाचवड, हस्तनापूर, थदाळे, शंभुखेड, हवालदारवाडी, मोही, इंजबाव, दानवलेवाडी, येळेवाडी व परकंदी या २२ गावांना लाभ मिळणार आहे.

पश्चिम माण उपसा सिंचन योजना : आंधळी धरणाच्या उजव्या तीरावरून पाणी उचलण्यात येणार आहे. ४.३ किलोमीटर उर्ध्वगामी नलिकेद्वारे १ हजार ८४८ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. पांढरवाडी, कोळेवाडी, दिवडी, महिमानगड, उर्किडे, पिंगळी बुद्रुक, सत्रेवाडी, मलवडी, आंधळी व सुरूपखानवाडी या दहा गावांचा समावेश आहे.

शिरवली माण उपसा सिंचन योजना : आंधळी बोगद्याच्या माध्यमातून मलवडी परिसराला पाणी उपलब्ध होणार आहे. ६.०१ किलोमीटर उर्ध्वगामी नलिकेद्वारे ९२३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शिरवली, कुळकजाई, बोथे, भांडवली व शिंदी बुद्रुक या पाच गावांना याचा लाभ मिळणार आहे.

जिहे-कठापूर योजनेतून यापूर्वी कठापूर बॅरेज, वर्धनगड बोगदा व आंधळी बोगद्याच्या माध्यमातून पाणी नेर व आंधळी धरणापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच पाणी व्यवस्थेच्या पुढील टप्प्यात या तीन उपसा सिंचन योजना राबवण्यात येणार आहेत. माण तालुक्यातील शेती पावसाच्या अनिश्चिततेवर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या योजनांमुळे शेतीला शाश्वत पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामांना लवकर सुरुवात व्हावी आणि शेतापर्यंत पाणी पोहोचावे, अशी अपेक्षा ३७ गावांतील शेतकरी व ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT