ढेबेवाडी : महिंद प्रकल्पातील गाळावर विटभट्टी सुरू, मराठवाडी धरणातून 5 हजार ब्रास गाळ विटभट्टीला विकला अशा घटना समोर येत असतानाच पुन्हा महिंद प्रकल्पातून हजारो ब्रास गाळाची महिंद ते कराड अशी राजरोस वाहतूक सुरू आहे. पण हा गाळ नेमका गेला कुणीकडे? असा प्रश्न महिंद प्रकल्प बाधित धरणग्रस्तांनी उपस्थित केला असून या गाळात कुणा-कुणाचे हात घाण झाले आहेत, याची चौकशी करण्याची मागणी महिंद प्रकल्पबाधित धरणग्रस्तांनी केली आहे.
याबाबत महिंद प्रकल्पग्रस्त पण गेल्या 27 वर्षातही पुनर्वसनाचे लाभ न मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केलेल्या संशयानुसार गेल्या आठवडाभरात महिंद धरणातून गाळ उपशाचे हे प्रकरण समोर आले आहे. आमच्या पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न न सोडविता सरकार गाळ विकून पैसे कमवित आहे की कुणाच्या राजाश्रयाने शासनाला चुना लावण्याचा उद्योग सुरू आहे, याची चौकशी करा अशी धरणग्रस्तांची मागणी आहे.
याबाबत धरणग्रतांनी दिलेल्या माहितीनुसार आम्हाला न्याय मिळत नाही अन् शासन आमच्याच जमिनी पाण्यात बुडवून साचलेला गाळ विकून पैसा कमवायला लागले आहे. गौण खनिज वा प्रकल्पातील गाळ यातून शासनाला जे उत्पन्न मिळते त्याच्या शंभर पटीहून अधिक रक्कम महसूल यंत्रणा, पाटबंधारे अधिकारी व राजकीय नेते, कार्यकर्ते मिळवून लक्षाधीश होत आहेत. त्यांना वरिष्ठ राजकीय पातळीवरून संरक्षण मिळते की काय ? असा संशय व्यक्त केला जात आहे.