सातारा : शिवसेना शिंदे गटाचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून महायुतीत रविवारी ठिणगी पडली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पालकमंत्र्यांवर थेट निशाणा साधला. जिल्ह्याचे पालकमंत्री कुणीही असले तरी भाजप कार्यकर्त्यांची अडवणूक होऊ देणार नाही. पाटणमधील विकासाला काहीही कमी पडू न देता विशेष पॅकेज देऊ, अशा शब्दांत ना. गोरे यांनी ना. शंभूराज देसाई यांना डिवचले. त्याचवेळी ना. शिवेंद्रराजे भोसले यांनीही पालकमंत्र्यांनी बैठक बोलावल्याचे मला आताच कळाले, जिल्ह्यात ज्याची-त्याची ताकद आहे, त्यानुसार जो तो लढायला मोकळा असल्याचे सांगत एक प्रकारे पालकमंत्र्यांना खुले आव्हानच दिले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय रणांगण चांगलेच तापले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत. जिल्ह्यात महायुती म्हणून बैठक होण्याऐवजी त्यांनी आपल्या साताऱ्यातील निवासस्थानी भाजपला दूर सारून दोन दिवसांपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संधान साधले. यावेळी बंद दाराआड खलबतेही करण्यात आली. त्यावर ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी पालकमंत्र्यांनीच महायुतीची बैठक घ्यायला हवी होती, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी ना. जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई यांच्यावरच थेट तोफ डागली.
भाजपने आयोजित केलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी ना. जयकुमार गोरे आले होते. या मुलाखतीनंतर त्यांनी पाटण येथील कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ना. गोरे म्हणाले, जिल्ह्याचे कुणीही पालकमंत्री असले तरी पाटणला आम्ही काही कमी पडू देणार नाही. भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याची कामे अडवली जाणार नाहीत. पाटण तालुक्यातून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. भाजपकडून लढण्यासाठी मोठ्या संख्येने उमेदवार इच्छुक आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाजप विजयी होईल, याची खात्री इच्छुकांना असल्यामुळे उमेदवारी मोठ्या प्रमाणावर मागितली गेली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी जो संघर्ष आहे त्यातून पाटण तालुक्यात भाजप किती मजबूत आहे, याचे चित्र समोर आले आहे. पाटण तालुक्यातील भाजपचे जुने-नवे कार्यकर्ते यांचा समेट घडवून आणून आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. आगामी काळामध्ये पाटणला आम्ही काही कमी पडू देणार नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांची अडवणूक कुठेही होणार नाही. त्यांना प्रशासनाकडून काडीचा त्रास होणार नाही. जिल्ह्याचा कुणीही पालकमंत्री असो. त्याची काळजी कार्यकर्त्यांनी करू नये. राज्यात सत्तेमध्ये युती असली तरी पाटण तालुक्यामध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे ना. गोरे यांनी स्पष्ट केले.
ना. शिवेंद्रराजे म्हणाले, निवडणुकीसाठी पालकमंत्र्यांनी बैठक बोलावल्याचे मला नुकतेच कळाले. आमच्या विरोधकांची ताकद मोठी असली तरी सत्यजित पाटणकरांसोबत सर्व पदाधिकारी भाजपमध्ये आले आहेत. पाटणमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी आम्ही सत्यजित पाटणकर यांच्यासोबत आहोत. आगामी काळात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही पाटणमध्ये जाणार आहे. ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व आपल्या पाठिशी आहे. त्यामुळे कुणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही.