Satara District Bank Pudhari Photo
सातारा

Satara District Bank : जिल्‍हा बँक अ‍ध्‍यक्षपदावरुन महायुतीत मतभेद

अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड १८ नोव्हेंबरला : सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्याकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर महायुतीतील भाजप आणि इतर घटक पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील, तोच जिल्‍हा बँकेचा अध्‍यक्ष होईल, असे ठणकावून सांगितले होते; तर त्‍याला प्रत्‍युत्तर देताना ना. शंभूराज देसाई यांनी महायुतीच्या समन्वयासाठी पुन्हा बैठक घेण्याची गरज असून जिल्‍हा बँकेतील कुठल्‍याही निर्णयाबद्दल मुख्‍यमंत्र्यांकडे जाऊन त्‍यांना त्रास देण्‍याची गरज नाही, असे स्‍पष्‍ट केले होते; तर ना. शिवेंद्रराजे भोसले यांनीही जिल्‍हा बँक अध्‍यक्षपदाबाबत प्रतिक्रिया देताना बँकेचा अध्‍यक्ष हा साताऱ्यातच निवडला जाईल, असे सांगितले.

ते म्हणाले, जिल्‍हा पातळीवरील नेत्‍यांसोबत चर्चा करून तोडगा निघाला नाही तर मुख्‍यमंत्र्यांचा सल्‍ला घेऊ, असे सांगत अध्‍यक्षपदाच्‍या राजकीय रणांगणात उडी घेतली. बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहेत.बँकेवर महायुतीने एकत्रित सत्ता मिळवल्यानंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग येणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये सत्तेचे वाटप नेमके कसे होणार, याबाबत उत्सुकता आहे. वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयानुसारच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जातील, अशी भूमिका यापूर्वी महायुतीच्या नेत्यांनी मांडली आहे.

बँकेच्या निवडणुकीत भाजपचे नऊ, राष्ट्रवादीचे आठ आणि शिवसेनेचे चार संचालक निवडून आल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार सोसायटी मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघांमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीतही वरिष्ठ पातळीवर समन्वय साधून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

अध्यक्षपदासाठी भाजपकडून ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आ. डॉ. अतुल भोसले यांच्या नावांची चर्चा आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे विश्वासू मानले जाणारे चंद्रकांत जाधव आणि ज्ञानदेव रांजणे यांचे नावही पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या नावाची चर्चा असून, शिवसेनेकडून पालकमंत्री शंभूराज देसाई आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा फॉर्म्युला निश्चित करणार आहेत. अध्यक्षपद कोणत्या पक्षाला द्यायचे, उपाध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवायची आणि संचालक मंडळात सत्तेचा समतोल कसा राखायचा, यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

अध्यक्षपद हे केवळ सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेचे पद नसून सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावाचे केंद्र मानले जाते. त्यामुळे या निवडीतून महायुतीतील नेत्यांचे परस्पर संबंध, पक्षांतर्गत समन्वय आणि आगामी राजकीय समीकरणांचे संकेतही मिळणार आहेत. आता तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक कधी होणार आणि सत्ता वाटपाचा कोणता फॉर्म्युला निश्चित होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. १८ नोव्हेंबरच्या निवडीतच या राजकीय घडामोडींचा अंतिम अंक स्पष्ट होणार आहे.

बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रित बैठका घेऊन जागावाटप केले आणि महायुती म्हणून निवडणूक लढवली. स्थानिक पातळीवर चर्चा करून वरिष्ठांकडे आपली भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे आता चेअरमन निवडीचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील.
- ना. जयकुमार गोरे
अध्‍यक्ष निवडीच्‍या विषयावर घटक पक्षातील नेत्‍यांनी माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा महायुतीची जिल्‍ह्यातील नेत्‍यांची बैठक होणे आवश्यक आहे. बिनविरोध जागा निश्चित करताना ज्या पद्धतीने बैठक झाली होती, त्याच पद्धतीने पुन्हा बैठक घेऊन सर्व घटक पक्षांनी समन्वयाने चर्चा करायला हवी. माध्यमांसमोर याबाबत बोलणे मला योग्य वाटत नाही. प्रत्‍येक निर्णयासाठी मुख्‍यमंत्र्यांकडे जाण्‍याची गरजही नाही.
- ना. शंभूराज देसाई
जिल्‍हा बँक अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष निवडीबाबत माझ्‍यासह खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, ना. शंभूराज देसाई आणि ना. मकरंद पाटील असे प्रमुख नेते एकत्रित चर्चा करतील. महायुतीचे नेते या विषयावर साताऱ्यात मार्ग काढतील आणि तोडगा निघाला नाही तरच मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री सुनेत्रा पवार यांचा सल्‍ला घेवून निर्णय घेतला जाईल.
- ना. शिवेंद्रराजे भोसले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT