महादरे तलाव ‘ओव्हरफ्लो’ 
सातारा

सातारकरांना दिलासा! महादरे तलाव ‘ओव्हरफ्लो’

पाणी पुरवठा होणार पूर्ववत: हत्ती तलावही भरला, कासची पातळी वाढली

पुढारी वृत्तसेवा

सातारा : उन्हाळ्यात कोरडाठाक पडलेला महादरे तलाव ’ओव्हरफ्लो’ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आधी हत्ती तलाव भरला आणि त्यानंतर त्याच्या प्रवाहामुळे महादरे तलावही ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे सातारा शहरावरील पाणीकपातीचे संकट टळले असून, पालिका लवकरच पाणीकपात मागे घेण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात सातारकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. शहराच्या व्यंकटपुरा पेठ, रामाचा गोट आणि चिमणपुरा पेठ या भागांना प्रामुख्याने पाणीपुरवठा करणारा महादरे तलाव आटल्याने या भागांतील पाणीपुरवठ्यात मोठी घट झाली होती. ही तूट भरून काढण्यासाठी कास धरणातून अतिरिक्त पाणी उपसले जात होते, ज्यामुळे कास पाणीपुरवठा योजनेवर मोठा ताण येऊन पश्चिम सातार्‍यातील वितरण व्यवस्था कोलमडली होती. परिणामी, कास धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही पालिकेला पाणीकपात लागू करावी लागली होती.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून सातारा शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे प्रथम हत्ती तलाव पूर्ण क्षमतेने भरला आणि त्यातून वाहणारे पाणी महादरे तलावात येऊ लागले. सोमवारी पावसाचा जोर कायम असतानाच महादरे तलावही काठोकाठ भरून वाहू लागला. दोन्ही तलाव भरल्याने आणि कास धरणाची पाणीपातळीही समाधानकारकपणे वाढल्याने आता शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य स्रोतांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे सातारा पालिका पाणीकपात मागे घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

सातारा शहराचा पाणीपुरवठा मुख्यत्वे कास धरणावर अवलंबून असला तरी, महादरे आणि हत्ती हे दोन तलावही काही भागांसाठी महत्त्वाचे आहेत. हे तलाव पावसावर अवलंबून असल्याने, पावसाचे प्रमाण कमी झाल्यास पाणीटंचाई निर्माण होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कास धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प पूर्णत्वास गेला असून, खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नांतून कास धरणाच्या वाढीव जलवाहिनीचे कामही प्रगतिपथावर आहे. यामुळे भविष्यात पाणीकपातीची वेळ येणार नाही, अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT