सातारा : साताऱ्यानजीकचे दरे खुर्द गाव... नाव घेताच डोळ्यासमोर उभे राहते ते हिरव्या गालिच्याने नटलेले डोंगर, वाऱ्याच्या मंद झुळकीत डोलणारी वृक्षराजी आणि त्या सगळ्यांत रंग उधळणारी फुलपाखरे. निसर्गाने जणू आपल्या कुंचल्याने रंगवलेली ही दरी. म्हणूनच राज्य शासनाने या गावाला फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित केले आणि विकासाचा आराखडाही तयार केला. तब्बल 125 कोटींचा निधी मंजूर झाला. पण आज हीच दरी वणव्याच्या ज्वाळांमध्ये होरपळत आहे. त्या ज्वाळांत फुलपाखरांसह संपूर्ण जीवसृष्टीचा आक्रोश सुरू आहे.
उन्हाळा सुरू झाला की डोंगरदऱ्यांवर वणव्याचे सावट अधिक गडद होते. साताऱ्यानजीकचा अजिंक्यतारा किल्ला परिसर असो किंवा दरे खुर्द, सांबरवाडीच्या डोंगररांगाही त्याला अपवाद नाहीत. गेल्या दोन दिवसांपासून या परिसरातील डोंगरच्या डोंगर पेटले आहेत. सुरुवातीला कुठेतरी लागलेली आग वाऱ्याच्या झोताने पसरत गेली आणि पाहता पाहता संपूर्ण दरी कवेत घेऊ लागली. वाळलेले गवत, पालापाचोळा आणि उन्हामुळे वाळून गेलेली झाडे यामुळे ही आग वाढतच गेली. या अग्निज्वाळांमध्ये फुलपाखरांचे हे गाव अक्षरश: तडफडताना दिसत आहे. ज्या दरीत कधी रंगीबेरंगी फुलपाखरे उडताना दिसायची, त्याच दरीत आता धुराचे काळे ढग उठत आहेत. ज्या झाडांवर फुलपाखरांचे थवे विसवत, त्याच झाडांची आता राखरांगोळी झाली आहे. जणू निसर्गाच्या या रंगमंचावरून जीवनाची रंगतच हरवून गेल्याचे चित्र दरे खुर्दच्या डोंगरदऱ्यात निर्माण झाले आहे.
आगीचा फैलाव इतका वेगाने झाला की दरे गावापासून सुरू झालेल्या ज्वाळा यवतेश्वर घाटापर्यंत पोहोचल्या. या संपूर्ण पट्ट्यातील वृक्ष-वेली होरपळून निघाल्या. झाडांच्या फांद्यांवर विसावलेली पक्ष्यांची घरटी क्षणार्धात भस्ममात झाली. अनेक पक्ष्यांची पिल्ले जिवंतपणी जळून गेल्याची हृदयद्रावक दृश्ये अनेकांनी पाहिली. काही पक्षी स्वत:चा व आपल्या पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी आकाशात भिरभिरताना दिसत होते, पण जिथे नजर टाकवी तिथे फक्त धूर आणि ज्वाळाच दिसत होत्या. जणू त्यांच्या जगण्याचा आधारच हिरावला गेला होता. या आगीत केवळ झाडे आणि गवतच नाही, तर असंख्य जीवजंतूचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कीटक, सरपटणारे प्राणी, लहान सस्तन प्राणी या सर्वांचा अधिवास या दरीत होता. आता त्या सगळ्यांचे आश्रयस्थान राखेत बदलले आहे. फुलपाखरांच्या विविध प्रजाती ज्या या भागाचे वैशिष्ट्य मानल्या जात होत्या, त्यांचे अस्तित्वही या आगीमुळे संकटात आले आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वात वेदनादायक बाब म्हणजे या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा कुठेही दिसली नाही. फुलपाखरांचे गाव म्हणून ज्या ठिकाणाला विशेष महत्व दिले गेले, त्याच ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ करण्यात आल्या नाहीत, अशी खंत पक्षीप्रेमींनी व्यक्त केली आहे. ज्या दरीसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला, त्या दरीचे रक्षण करण्यासाठी मात्र कुठलीच हालचाल दिसून न आल्याने ही वस्तुस्थिती पक्षी निरीक्षकांनाही बोचरी ठरली आहे.
उन्हाळ्यात अशा प्रकारचे वणवे वारंवार लागतात. काही वेळा मानवी निष्काळजीपणामुळेही आग लागते. मात्र अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असते. जंगल भागात अग्निरोधक उपाययोजना, अग्निशमन यंत्रणा आणि सतत देखरेख ठेवली पाहिजे. परंतु दरे खुर्द परिसरात अशा उपाययोजनांचा अभाव असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. या दरीतील शांततेत आता वेगळाचा आवाज घुमत आहे. जळणाऱ्या लाकडांचा, तुटणाऱ्या फांद्यांचा आणि जीव वाचवण्यासाठी धडपणाऱ्या वन्यजीवांचा. काही दिवसांपूर्वीपर्यंत पर्यटकांना भुरळ घालणारे हे निसर्गरम्य ठिकाणी आता उदास आणि विदीर्ण दिसत आहे. हिरवाईच्या जागी काळसर राख पसरली असून त्या राखेतून उरलेले वन्यजीवन पुन्हा उभे राहील का, हा प्रश्न पक्षीप्रेमींसमोर उभा आहे.
फुलपाखरांचे गाव ही या दरे खुर्दची ओळख असली तरी त्या मागे एक समृद्ध जैवविविधता लपली होती. त्या विविधतेचे संवर्धन करणे ही प्रशासनाची जितकी जबाबदारी आहे तितकीच नागरिकांचीही आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या आगीने या जबाबदारीची जाणीव अधिक तीव्रपणे करून दिली. सध्या दरे खुर्दची दरी आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळत आहे. त्या ज्वाळांमध्ये फुलपाखरांचे रंग उडून चालले आहेत, पक्षांच्या घरट्यांची राख होत आहे आणि निसर्गाचा एक सुंदर अध्याय काळवंडत चालला आहे. ही वणव्याने लागलेली आग असली तरी निसर्गसंपन्न जपण्याची हाक आहे, ती वेळेत ऐकली गेली तरच हे फुलपाखारांचे गाव पुन्हा एकदा रंगांनी फुलून येईल!