महाबळेश्वर-मेढ्याजवळील तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू 
सातारा

Satara Accident : महाबळेश्वर-मेढ्याजवळील तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

महाबळेश्वर - तापोळा मार्गावर ट्रक ब्रेकफेल झाल्याने उडी टाकल्यामुळे क्लिनर ठार

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर/मेढा/केळघर : महाबळेश्वर व मेढानजिक झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांना प्राण गमवावे लागले. महाबळेश्वर-तापोळा मार्गावर ट्रक ब्रेकफेल झाल्याने उडी टाकल्यामुळे क्लिनर ठार झाला. तर केळघर घाटात ट्रक अपघातात चालक ठार झाला. मेढ्याजवळ रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला.

महाबळेश्वर शहरापासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर तापोळा मुख्य रस्त्यावरील चिखली शेड परिसरात मालट्रकचा अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील क्लीनरचा जागीच मृत्यू झाला असून अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे. याप्रकरणी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाआहे. महबूब सुबानी शेख (वय 44, रा. वरव कट्टा, आंध्रप्रदेश) असे ठार झालेल्या क्लीनरचे नाव आहे. आंध्रप्रदेशातील मंतूर येथून फरशी भरून मालट्रक साताऱ्याकडे आला होता. महाबळेश्वरमधील ठिकाणाची माहिती देण्यासाठी दुसऱ्या एका ट्रक मालकाने आपला क्लीनर या ट्रकसोबत पाठवला होता. साताऱ्यातून महाबळेश्वर मार्गे तळदेवकडे निघालेला मालट्रक चिखली शेड परिसरात आला असता, ब्रेक फेल झाल्याचा अंदाज आल्याने क्लीनर महबूब शेख यांनी ट्रकमधून उडी मारली. मात्र, दगडावर डोके आपटल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर ट्रक चालकाने वाहन घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेची फिर्याद दुसरे क्लीनर मोल्लाली बुडे साहेब शेख (वय 42, रा. तुरकापालनता, आंध्रप्रदेश) यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून चालकाचा शोध सुरू केला आहे. केसकरवाडी, (ता. जावली) येथे सातारकडे जाणाऱ्या भरधाव रुग्णवाहिकेने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात अनिल विष्णू धनावडे (वय 27, रा. मेढा) याचा जागीच मृत्यू झाला. तर अभिजीत संजय जाधव (वय 30, रा. गांजे, ता. जावली) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

अनिल व अभिजीत दुचाकी (क्रमांक एमएच 11 डीई 1287) वरून आपल्या गावाकडे जात होते. केसकरवाडी गावाजवळ आले असता सातारकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेने (क्रमांक एमएच 11 एबी 8195) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की दोघेही दुचाकीवरून 50 फूट दूर अंतरावर फेकले गेले. यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अनिलचा मृत्यू झाला. तर अभिजीत हा गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

केळघर घाटात गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मुकवली (माची) गावच्या हद्दीत क्रेशर बस स्टॉपच्या पुढील वळणावर ट्रकचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला. त्यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. चालक आजीनाथ नागरगोजे (वय 32, रा. बीड) हे केमिकल पावडर घेऊन रोहा येथून साताऱ्याकडे निघाले होते. केळघर घाटात मुकवली (माची) गावच्या हद्दीत एक अवघड वळणावर अपघात झाला. चालक नागरगोजे यांचा मृत्यू झाला. मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, अश्विनी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्स, रेंगडी व मुकवली माची येथील ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रकमधील चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT