सातारा

Satara ST Bus : लांब पल्यासह ग्रामीण भागातील एसटी सेवा विस्कळीत; साताऱ्यात प्रवाशांची गैरसोय

प्रवाशांमधून संताप व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या सातारा विभागातील सुमारे ३०० बसेस कोकणात गेल्या असल्याने सातारा जिल्ह्यातील ११ आगारातील लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातील फेऱ्या विस्कळीत झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर एसटी बसेसची वाट पहात उभे रहावे लागले. प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

गणेशोत्सवासाठी कोकणाकडे मोठ्या संख्येने प्रवासी रवाना होत आहेत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेवून एसटी महामंडळाकडून जादा फेऱ्या आणि विशेष बससेवा चालवण्यात येत आहेत. एसटी महामंडळाच्या सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, फलटण, पारगाव खंडाळा, कोरेगाव, वडूज, दहिवडी, मेढा या ११ आगारातील सुमारे ३०० हून अधिक बसेस कोकणात गेल्या होत्या. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या फेऱ्या विस्कळीत झाल्या होत्या.

पुणे, मुंबई, कराड, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना दिवसभर गैरसोयीला सामोरे जावे लागले. सातारा बसस्थानकात प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना एसटी बसेसची वाट बघत बसावे लागले. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी झाली होती. मात्र वेळेत बसेस उपलब्ध झाल्या नसल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT