सातारा

Satara News: सातारा-लोणंद मार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; वृक्षप्रेमींकडून संताप

परवाना न घेताच ठेकेदाराकडून झाडे रफादफा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा-लोणंद महामार्गाच्या कामादरम्यान रस्त्यालगत उभ्या असलेल्या शेकडो जुन्या वृक्षांची कत्तल करण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याच्या कडेला नाले बांधण्याचे कारण पुढे करून वड, पिंपळ, पिंपरण, गुलमोहर, आंबा, बाभूळ यांसारखे अनेक मोठे वृक्ष तोडण्यात आले आहेत. या रस्‍त्‍याच्‍या ठेकेदाराने कोणताही परवाना न घेता झाडे तोडून ती रांजणगावला विकल्‍याचा आरोप वृक्षप्रेमींकडून होत असून संबंधित ठेकेदाराची चौकशी करुन कारवाई करण्‍याची मागणी होत आहे.

वृक्षप्रेमींनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत, तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या लाकडाचा हिशोब कुठे आहे? ते कोणाच्या ताब्यात देण्यात आले आणि त्याची नोंद संबंधित विभागाकडे आहे का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर मिळालेल्या लाकडाचा पारदर्शक लेखाजोखा जाहीर करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

यापैकी अनेक वृक्ष दीडशे ते दोनशे वर्षे जुने होते. या वृक्षांनी अनेक पिढ्यांना सावली दिली होती तसेच परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, महामार्गाच्या कामाच्या नावाखाली त्यांची कोणतीही पर्यायी व्यवस्था किंवा पुनर्लागवडीचे नियोजन न करता सर्रास कत्तल करण्यात आली.

काही नागरिकांनी कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत असून संबंधित यंत्रणेकडून प्रभावी देखरेख होत नसल्याचा आरोप केला आहे. पर्यावरणीय नियमांचे पालन झाले का? आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का? आणि तोडलेल्या प्रत्येक वृक्षाच्या बदल्यात वृक्षारोपणाची अट पाळली जाणार का? याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT