Gold Theft Pudhari
सातारा

Satara Gold Theft: लोधवडेत चोरट्यांचा धुमाकूळ; साडेसहा तोळे सोने लंपास

मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवून साडेसहा तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची खळबळजनक घटना

पुढारी वृत्तसेवा

दहिवडी : माण तालुक्यातील लोधवडे येथील वस्तीवर मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवून साडेसहा तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची खळबळजनक घटना घडली. सुमारे सात लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोधवडे येथील नारायण चोपडे व त्यांच्या पत्नी शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास घराबाहेरील पडवीत झोपले होते. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज झाल्याने ते जागे होताच तीन चोरट्यांनी त्यांना घेरले. शस्त्राचा धाक दाखवत घराची चावी हिसकावून घेतली. चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील पाच तोळे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले. एवढ्यावरच न थांबता बाहेर येऊन नारायण चोपडे यांच्या पत्नीच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्रही हिसकावून घेतले आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

या दरोड्यात चार ते पाच चोरटे सहभागी असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटरपर्यंत कोणतीही वस्ती नसल्याने चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा गुन्हा केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच दहिवडीचे सपोनि भाऊसाहेब गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी-पाटील यांनीही पाहणी केली.

डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले असून गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी दोन विशेष पथके तातडीने रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT