सातारा : सातार्यात जानेवारीत होणार्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्याही नावाची चर्चा आहे. नेमाडे यांनी यापूर्वीच नकार दिला असल्याने विश्वास पाटील यांचे नाव अंतिम होणार असल्याची चर्चा आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यात आज होणार्या बैठकीत ‘पानिपत’कारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारीत सातार्यात होत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा व मावळा फौंडेशन यांच्या वतीने या साहित्य संमेलनाचे आयोजन होत आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात मराठी भाषा मंत्री उदय सामंत व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या बोध चिन्हाचे अनावरण झाले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबाबतही गेले काही दिवस चर्चा सुरू आहे.
ज्ञानपीठ विजेते ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांना 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची विनंती केल्याचे बोलले जात आहे. मात्र, नेमाडे यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदास नकार दिल्याची चर्चा आहे. तरीही अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या रविवारी पुण्यात होणार्या बैठकीत नेमाडे यांच्या नावावर नव्याने चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. नेमाडे यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारावे यासाठी गळ घालण्याचे प्रयत्नही सुरू असल्याची चर्चा आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष राहिलेले प्रा. रंगनाथ पठारे यांचेही नाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्यांच्याही नावावर रविवारी चर्चा होणार आहे. त्याचवेळी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे नाव मात्र या शर्यतीत सर्वांत पुढे असल्याचे बोलले जात आहे. कादंबरीकार विश्वास पाटील यांचे मराठी साहित्यातले योगदान लक्षात घेता व त्यांच्या कादंबर्यांची लोकप्रियता विचारात घेता व मराठ्यांच्या इतिहासासंदर्भात त्यांचे असलेले काम लक्षात घेता स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या सातार्यात होणार्या 99 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ विश्वास पाटील यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे. साहित्य महामंडळाच्या आजच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. यापूर्वी 98 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीही त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र ऐनवेळी त्यांचे नाव मागे पडले. त्याची पुनरावृत्ती तर घडणार नाही ना, याचीही चर्चा सुरू आहे.