शिवथर (ता. सातारा) येथे बिबट्या दिसल्याच्या ठिकाणी पाहणी करताना ग्रामस्थ व वन विभागाचे कर्मचारी.  
सातारा

Satara Leopard Terror| शिवथरमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत

पंधरा दिवसांपासून वारंवार दर्शन : ऊसतोड मजुरांमध्ये भीती

पुढारी वृत्तसेवा

शिवथर : शिवथर, ता. सातारा परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकरी आणि ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ऊसतोड कामगारांच्या खोपटीशेजारील शेतात बिबट्या आणि त्याची दोन पिल्ले दिसल्याने परिसरात खळबळ उडाली. वन विभागाने तातडीने बिबट्याचा शोध घेऊन पिंजरे लावावेत, अन्यथा न्हाळेवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

शिवथर परिसरातील शेतशिवारात विविध साखर कारखान्यांचे ऊसतोड मजूर पाण्याच्या उपलब्धतेनुसार कोपटी उभारून वास्तव्यास आहेत. रविवारी सकाळी कामगारांना राहत्या खोपटीजवळील शेतात बिबट्या व त्याची दोन पिल्ले दिसली. याची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच वन विभागाला माहिती दिली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आढळलेले ठसे बिबट्याचे नसल्याचे सांगितले. मात्र, वारंवार बिबट्या दिसत असल्याचे सांगणारे ग्रामस्थ चुकीची माहिती देत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यापूर्वीही शिवथर व परिसरातील गावांमध्ये बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या तक्रारी वन विभागाकडे करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

न्हाळेवाडी, ता. सातारा येथे बिबट्याच्या हल्ल्यात जय खंडागळे या दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर वन विभागाने ड्रोनद्वारे शोधमोहीम राबवून पिंजरे लावले होते. मात्र, त्यावेळीही बिबट्या पिंजऱ्यात अडकला नव्हता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये अद्याप भीती कायम आहे.

सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने मजुरांचे वास्तव्य शेतातच आहे. त्यातच दिवसा वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीही पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीची कामे वाढली असताना बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी आणि ऊसतोड मजुरांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. वन विभागाने बिबट्या दिसलेल्या ठिकाणी ड्रोनच्या साहाय्याने सखोल पाहणी करावी आणि आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT