बिबट्या मादीची बछड्याशी सुखरूप भेट 
सातारा

Satara News| बिबट्या मादीची बछड्याशी सुखरूप भेट

वन कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे टळले मोठे संकट.

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शहापूर येथे वन विभागाच्या सतर्कतेमुळे आईपासून विभक्त झालेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांची त्यांच्या आईशी सुखरूप भेट घडवून आणण्यात यश आले आहे.

तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर रविवारी रात्री वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या मादी जेरबंद झाली. त्यानंतर वन विभाग अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने मादी व तिच्या दोन्ही बछड्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

शहापूर येथील शेतकरी पुरुषोत्तम माने यांच्या शेतात तीन दिवसांपूर्वी ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे दहा ते बारा दिवसांचे दोन बछडे आढळून आले. याची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बछडे लहान असल्याने त्यांची आई याच परिसरात येण्याची शक्यता लक्षात घेऊन घटनास्थळी पाळत ठेवली. बिबट्या मादी घटनास्थळी आली होती; मात्र काही कारणास्तव तिने बछड्यांना सोबत नेले नाही. त्यामुळे वन विभागाने खबरदारी घेत दोन्ही बछड्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन त्यांच्या संगोपनाची व्यवस्था केली. त्याचवेळी मादीचा शोध घेण्यासाठी परिसरात पिंजरा लावला होता. रविवारी रात्री ही मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून स्थानिक पदाधिकारी, शेतकरी, ऊसतोडणी मुकादम व कामगारांच्या मदतीने पुढील कार्यवाही केली. बिबट्या मादीचे वय अंदाजे अडीच वर्षे असून तिच्या दोन्ही बछड्यांचा जन्म दहा ते बारा दिवसांपूर्वी याच उसाच्या फडात झाला असावा, असा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वनपाल सुरेखा जगदाळे, सुहास बर्गे, अजय कांबळे, सुनील शेलार, प्रवीण माकर आणि हणमंत चव्हाण यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT