सातारा

Satara leopard accident: दुचाकीच्या धडकेत बिबट्या बेशुध्द

कराड-ढेबेवाड रस्त्यावर विंग येथील घटना; दुचाकीस्वार जखमी

पुढारी वृत्तसेवा

ढेबेवाडी : कराड-ढेबेवाडी रस्त्यावर शिंदेवाडी(विंग) फाट्याजवळ शुक्रवारी रात्री दुचाकीस्वार व बिबट्या यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातानंतर काही काळ रस्त्यावरच बेशुद्ध पडलेला बिबट्या नंतर उठून निघून गेला.

याबाबत काही प्रवासी व स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार वेगाने कराडच्या दिशेने जात असताना विंग-शिंदेवाडी दरम्यान त्रिमूर्ती मंगल कार्यालयासमोर अचानक दुचाकी समोर बिबट्या रस्त्यावर आला. त्यामुळे दुचाकी व बिबट्याची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला, तर बिबट्याही काही काळ रस्त्यावरच आडवा पडला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी दुचाकीस्वाराला सुरक्षित ठिकाणी हलवले. तर रस्त्यावर निपचित पडलेला बिबट्याही थोड्याच वेळाने उठून गुरगुरत गर्दीच्या दिशेने धावल्याने बघ्यांची तारांबळ उडली. यावेळी आरडाओरडा झाल्याने घाबरेल्या बिबट्याने डोंगराच्या दिशेने धुम ठोकली.दरम्यान, या भागात बिबट्यांचा वावर सातत्याने समोर येत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. वन विभागाने योग्य उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT