Leopard Attack Pudhari
सातारा

Satara Leopard Attack : घरात घुसून बिबट्याने घोटला चिमुरड्याचा गळा

न्हाळेवाडी येथील हृदयद्रावक घटना : दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू; लाईट गेल्यामुळे होता अंधार

पुढारी वृत्तसेवा

शिवथर : सातारा तालुक्यातील न्हाळेवाडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. जय संदीप खंडागळे असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसरात अंधार पसरला असताना घराच्या दरवाजातून बाहेर येत असलेल्या जयवर बिबट्याने अचानक झडप घातली. त्याला तोंडात पकडून बिबट्या घराशेजारील शेताच्या दिशेने घेऊन गेला. या घटनेने शिवथर परिसरासह जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संदीप खंडागळे हे शेतमजूर असून त्यांचे न्हाळेवाडी येथे शेतालगत घर आहे. परिसरातील सर्व शिवारात ऊस आहे. त्यामुळे या परिसरात गेल्या दीड महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास न्हाळेवाडी येथे अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे गावात आणि परिसरात अंधार पसरला होता. याच अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने गावातील वस्तीत प्रवेश केला. जय खंडागळे हा दोन वर्षांचा चिमुरडा लघुशंकेसाठी घराच्या दरवाजातून बाहेर येत होता. त्याचक्षणी बिबट्याने त्याच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने जयला तोंडात पकडून शेताच्या दिशेने धाव घेतली. हा प्रकार घरात असलेल्या जयच्या वडिलांनी पाहिला. भेदरलेल्या वडिलांनी टाहो फोडला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून अन्य कुटुंबी य व लगतचे गावकरीही भेदरले. साऱ्यांनी एकत्र येत शेताकडे धाव घेतली.

चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केल्याची बातमी समजताच न्हाळेवाडीतील ग्रामस्थही खंडागळे यांच्या घराकडे आले. काही क्षणांतच गावातील अनेक युवक घटनास्थळी जमा झाले. बिबट्या जयला घेऊन ज्या दिशेने गेला होता, त्या दिशेने न्हाळेवाडी आणि मालगाव येथील शेकडो युवकांनी शेताकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी आरडाओरडा करीत जयचा शोध सुरू केला.

ग्रामस्थांच्या आरडाओरडण्याच्या आवाजामुळे बिबट्याने शेताच्या बांधावर जयला सोडून तेथून पळ काढला. काळोखामुळे काही दिसत नव्हते. विजेच्या बॅटरीच्या सहाय्याने ग्रामस्थांनी घरापासून शेताच्या दिशेने रक्ताचे डाग दिसत असलेल्या मार्गाने शोध घेतला. यावेळी शेताच्या बांधावर जय मृतावस्थेत आढळून आला. बिबट्याच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला.

दोन वर्षांच्या चिमुरड्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी काही वेळातच परिसरातील गावांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. न्हाळेवाडी, मालगाव आणि शिवथर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवी वस्तीत तेही घराच्या दारातच बिबट्याने हल्ला केल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्याच मनात या घटनेमुळे भीती निर्माण झाली आहे.या घटनेमुळे न्हाळेवाडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, परिसरात वन विभागाने गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT