सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर कराडकडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर रविवारी पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरात होती की बिबट्याचा चेहरा पूर्णपणे तुटला. वाहनधारक वाहन घेऊन पसार झाला आहे. ही दुर्घटना साताऱ्याजवळील खिंडवाडी येथे महामार्गावर घडली.
महामार्गावर बिबट्याचा अपघात झाल्याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक संरक्षक प्रदीप रौंधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे वनपाल सातारा सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक भरतगाव अभिजीत कुंभार, वनरक्षक सातारा मुकेश राऊळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे पाचच्या सुमारास महामार्गाच्या मुख्य मार्गीकेवर रक्ताच्या थरोळ्यात पडलेला बिबट्या वन कर्मचाऱ्यांना आढळून आला. वन कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांकडे चौकशी केली. अपघात ग्रस्त वाहनाचा पार्टही कुठेही पडलेला आढळून आला नाही.
पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी होती. त्यामुळे अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही. तसेच प्रत्यक्षदर्शी व्यक्ती देखील उपलब्ध झाला नाही. मात्र कराडच्या दिशेकडून साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या वेगवान वाहनाने बिबट्याला धडक दिलाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पूर्व भागातून भक्षाच्या शोधात हा बिबट्या महामार्गावर आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा तीन वर्षाची वाढ झालेला सशक्त मादी बिबट्या होता. वन कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला वनभवनातील उपचार केंद्रात आणले. या ठिकाणी बिबट्याचे शव विच्छेदन करण्यात आले. तसेच त्याच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले.
नऊ वर्षांत पाच बिबट्यांनी गमावला जीव
अजिंक्यतारा किल्ल्यावरून पूर्वेच्या बाजूला भक्षाच्या अथवा पाण्याच्या शोधात वन्यजीव रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. गेल्या नऊ वर्षांमध्ये याच परिसरामध्ये पाच बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उतार असल्यामुळे या ठिकाणी वाहनांचा वेग वाढतो. त्यातच वन्यजीवांना जीव गमवावा लागत आहे. येथे कॅटल पास होणे अत्यंत जरुरीचे आहे. महामार्ग प्राधिकरणाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.