सातारा : न्हाळेवाडी, ता. सातारा येथे शनिवारी रात्री अवघ्या दीड वर्षाचा मुलाला बिबट्याने ठार केल्यानंतर रविवारी सकाळी या घटनेचे पडसाद सातार्यात उमटत ग्रामस्थांनी आक्रोश केला. वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सिव्हीलमधून मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा न्हाळेवाडी, मालगाव, शिवथर ग्रामस्थांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला.
जय खंडागळे (वय दीड वर्ष) या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात शनिवारी मृत्यू झाल्यानंतर मृतदेह सिव्हीलमध्ये आणण्यात आला. जय याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेची माहिती पंचक्रोशीत पसरल्यानंतर शनिवारी रात्रीपासून ग्रामस्थ आक्रमक झाले होते. दररोज मरणाची भिती बाळगून राहावे लागत असताना तान्हुल्याचा मृत्यू झाल्याने वन विभागाच्या कारभाराबाबत ग्रामस्थांची आणखी खदखद निर्माण झाली.
रविवारी न्हाळेवाडी, शिवथर, मालगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सातार्यातील सिव्हील रुग्णालयात जमले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. पोलिसही घटनास्थळी जमा झाले. पोनि निलेश तांबे यांनी ग्रामस्थांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ विविध मागण्यांवर ठाम राहिले. सकाळी ८ वाजल्यापासून ११.३० पर्यंत चर्चा सुरु होती.
बिबट्याच्या वाढत्या वावराबाबत यापूर्वी तक्रारी वनविभागाकडे करण्यात आल्या आहेत. वनविभागाने स्वत: याबाबत माहिती घेवून उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र वनविभागाने योग्य ती खबरदारी घेतली नाही. यातूनच तान्हुल्या बाळाचा मृत्यू झाला आहे.-विवेक मोझर-पाटील, ग्रामस्थ
सातारा तालुक्यातील नहाळेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षांच्या जय संदीप खंडागळे या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधार असताना घराच्या दारातून बाहेर पडलेल्या चिमुरड्यावर बिबट्याने झडप घातली आणि त्याला तोंडात पकडून शेताच्या दिशेने नेले. काही वेळातच ग्रामस्थांनी शोध घेतला; मात्र जयचा जीव वाचवता आला नाही. या घटनेने केवळ एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले नसून वनविभाग आणि महावितरणच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
वनविभाग आणि महावितरणकडून नागरिकांच्या सुरक्षेबाबत मोठमोठी आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती बदलत नसेल तर त्या आश्वासनांचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 'बडी बडी बाते और वडापाव खाते!' या उपरोधिक शब्दांत ग्रामस्थांकडून दोन्ही विभागांच्या कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांनी बैठका घ्यायच्या, पाहणी करायची, आश्वासने द्यायची; पण बिबट्याचा धोका आणि वीजखंडित होण्याची समस्या कायम राहायची, तर या सगळ्या यंत्रणेचा उपयोग काय? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
सातारा तालुक्यासह जिल्ह्यातील डोंगराळ भागात मानवी वस्ती झपाट्याने वाढत आहे. अनेकांनी शेतांमध्ये घरे बांधली आहेत. त्यामुळे वन्यजीवांच्या अधिवासालगत मानवी हालचाली वाढल्या आहेत. दुसरीकडे बिबट्या, रानडुक्कर आणि अन्य वन्यप्राण्यांचा मानवी वस्त्यांमध्ये वावर वाढत असल्याने संघर्षाच्या घटना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत वनविभागाने केवळ घटना घडल्यानंतर धाव घेण्याऐवजी धोका असलेल्या गावांची यादी तयार करून नियमित गस्त, कॅमेरा ट्रॅप, जनजागृती आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.
जय खंडागळे या निष्पाप चिमुरड्याचा मृत्यू हा नहाळेवाडीकरांसाठी मोठा धक्का आहे. घराच्या दारातच बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वनविभागाला बिबट्याच्या वावराची पूर्वकल्पना होती का? होती तर कोणत्या उपाययोजना केल्या? महावितरणला या भागातील वारंवार वीजखंडित होण्याची माहिती होती का? असल्यास कायमस्वरूपी उपाययोजना का झाल्या नाहीत? या प्रश्नांची उत्तरे आता कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून देण्याची वेळ आली आहे. एका निष्पाप जीवाच्या मृत्यूनंतरही जर प्रशासन केवळ आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिले, ग्रामस्थांच्या उपरोधिक टीकेला उत्तर कोण देणार, असा सवाल नहाळेवाडी परिसरातून उपस्थित होत आहे.