Satara ZP  Pudhari
सातारा

Satara ZP: लक्ष्मणतात्यांनी केले झेडपी अध्यक्षपदाचे रेकॉर्ड

यशवंत विचारांच्या निष्ठेचे शरद पवारांकडून झाले होते कौतुक

पुढारी वृत्तसेवा

सातारा : स्वातंत्र्यसैनिक आबासाहेब वीर यांचे बोट धरुन राजकारणात आलेल्या लक्ष्मणतात्यांनी काँग्रेसला चांगलाच हात दिला होता. सरपंच ते खासदारकी व्हाया झेडपी असा प्रवास करताना लक्ष्मणतात्यांच्या राजकीय वाटचालीत अपवाद वगळता पराभव त्यांना कधीच शिवलाच नाही. त्यामुळेच त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर लक्ष्मण रेषा उमटवली. तात्यांच्या कार्यकर्तृत्वाची ही दबंगगिरी कोणालाही लाजवेल अशीच राहिली. लक्ष्मणतात्यांनी 16 सप्टेंबर 1980 ते 30 जून 1990 असे सलग 10 वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

बोपेगाव, ता. वाई हे लक्ष्मणतात्या पाटील यांचे गाव. राजकीय वारसा घरात असला तरी त्यांनी राजकीय वाटचाल आपल्या कर्तृत्वाने चोखळली. याच चोखळलेल्या पायवाटेचाच पुढे राजमार्ग झाला आणि लक्ष्मण तात्यांनी वाई तालुक्याचा झेडपीचा गाडा सलग 11 वर्षे यशस्वीपणे हाकला. दरम्यान, लहानपणी त्यांना शिक्षणासाठी पुण्याला रहावे लागले. शिक्षण घेत असतानाच बंधूच्या अकाली निधनामुळेच त्यांच्यावर घरची जबाबदारी येवून पडली. त्यावेळी आबासाहेब वीर यांच्या संपर्कात आलेल्या तात्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मणतात्या सन 1960 साली बोपेगावचे सरपंच झाले. एक तप त्यांनी सरपंचकी करुन पंचायत समिती सभापती म्हणून आपले कर्तृत्व सिद्ध करत 10 वर्षे यशस्वीपणे काम केले.

किसनवीर यांच्या मदतीने त्यांची खरेदी विक्री संघावर वर्णी लागली. सन 1980 साली लक्ष्मणतात्या झेडपीवर निवडून आले. त्यांनी सलग 11 वर्षे जिल्हा परिषदेचा गाडा समर्थपणे हाकला. त्यावेळी जिल्ह्यात काँग्रेस हाच मातब्बर पक्ष होता. त्यामुळे काँग्रेसकडून आमदारकीचे तिकीट मिळावे यासाठी प्रतापराव भोसले यांच्याकडून झालेल्या प्रयत्नात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांच्यातील बंडखोर कार्यकर्ता जागा झाला. मात्र तात्यांनी बंडखोरी करुनही यश आले नाही. लक्ष्मणतात्यांनी सन 1992 साली किसनवीर कारखान्यावर आपल्या आमदारकीच्या वाटचालीत विजय पताका फडकावली. तब्बल 8 वर्षाचा कालावधी लोटून गेल्यावर लक्ष्मणतात्यांचा यशाचा वारू पुन्हा आमदारकीच्या दिशेने उधळला.

काँग्रेस पक्षात सुरू असलेली धूसफूस लक्ष्मणतात्यांच्या राजकीय वाटचालीस पुरक ठरली. सरपंच, तालुका पंचायत समिती सभापती, खरेदी विक्री संघ अध्यक्ष, कारखान्याचे चेअरमन आणि आमदारकीसाठी दिलेली झुंज एवढा सारा अनुभव लक्ष्मणतात्यांच्या पाठीशी होता. विविध पदावर काम करताना तात्यांनी कार्यकर्त्यांची मोठ बांधली होती. रोखठोक आणि हजर जबाबीपणा हे तात्यांचे स्वभाव वैशिष्टय आहे.त्यामुळे काही वेळा त्यांचे बोलणे फटकळ वाटले तरी मनाने ते प्रेमळ आणि हळवे असल्याचा कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे तात्यांभोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ असायचे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तात्यांना त्यावेळी जिल्हाध्यक्ष केले.

आमदारकीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच त्यांनी खासदारकीची तयारी केली. याचा त्यांना वेळोवेळी फायदा झाला. यावेळी जिल्हा बँकेची लागलेली निवडणूकही चांगलीच गाजली. एका बाजूला पृथ्वीराज चव्हाण, प्रतापराव भोसले व त्यांचे कार्यकर्ते तर, दुसऱ्या बाजूला अजित पवार, शालिनीताई पाटील, विलासकाका उंडाळकर, मदनराव पिसाळ, भाऊसाहेब गुदगे असे मातब्बर नेते होते. अत्यंत चुरशीने लढलेल्या निवडणुकीत तात्यांचा विजय झाला. त्यांनी पक्षासाठी खाल्लेल्या खस्ता आणि कार्यकर्त्यांना सोबत घेत उपसलेल्या कष्टाचे चीज झाले. याची दखल घेत काही वर्षांतच तात्यांना खासदारकीचे तिकीट मिळाले अन्‌‍ तात्या सन 2004 साली लोकसभेत निवडून गेले.

लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तात्यांनी विविध शासकीय योजना मार्गी लावल्या. किसनवीर कारखान्याचे काम करत असताना कामगार आणि शेतकरी यांच्याच हिताचा त्यांनी विचार केला. शेतकऱ्यांसाठी ऊसदर आणि कर्मचाऱ्यांचे पगार यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. गावापासून जिल्हा पातळीवर काम करत असताना त्यांनी शासनाच्या विविध उपक्रमांतून लोककल्याणकारी योजना राबवल्या. शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम सुरु केले. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ‌‘गाव तेथे ग्रंथालय‌’ हा यशवंत विचार जपण्यासाठी तसेच जिल्ह्यात ग्रंथालयचळवळ उभी राहण्यासाठी त्यांनी जिल्ह्याच्या ग्रंथालय चळवळीतही काम केले.

लक्ष्मणतात्यांच्या पंच्याहत्तरीचा कार्यक्रम साताऱ्यात झाला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी लक्ष्मणतात्यांचा यथोचित शब्दांत गौरव केला. पक्षांतर्गत उलथापालथीवेळी तात्यांनी यशवंत विचार जपल्याचे खा. पवार यांनी आवर्जुन सांगितले. आयुष्यातील पंच्याहत्तरी, 50 वर्षे राजकारणात तात्यांनी घालवली. तात्यांनी सर्वसामान्य निस्पृही सेवा केली. यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल त्यांना असलेली आस्था व्यक्त करण्यासाठीच मी आलो असल्याचे खा. शरद पवार यांनी त्यावेळी सांगितले होते. यावरून तात्यांचे राजकारण किती वैचारिक उंचीचे होते हे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT