सातारा

Satara House Robbery: कुरोलीत गवंडी कारागिराच्या घरात धाडसी चोरी; अडीच लाखांचा ऐवज लंपास

सहा वर्षांच्या मुलाच्या गळ्यातील सोन्याचा ताईतही लांबवला

पुढारी वृत्तसेवा

वडूज : सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव येथील यशवंत बाबा आश्रम परिसरात राहणाऱ्या गवंडी कारागिराच्या घरात मध्यरात्री घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व अन्य साहित्य असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. घरातील सहा वर्षांच्या मुलाच्या गळ्यातील सोन्याचा ताईतही चोरट्यांनी कापून नेला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत किरण नामदेव म्हस्के (रा. शेवगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. म्हस्के हे सिद्धेश्वर कुरोली येथील यशवंतबाबा मंदिराच्या कामासाठी तेथे वास्तव्यास आहेत. गुरुवारी मध्यरात्री म्हस्के कुटुंबीय घरात झोपले असताना रात्री सुमारे दोन वाजता त्यांची आई जागी झाली. घरातून कोणीतरी बाहेर गेल्याचे तसेच दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील दिवा लावल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले.

चोरट्यांनी सुमारे १ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम व एक तोळा सोन्याचे दागिने ठेवलेली पेटीच लंपास केली. तसेच दोन मोबाईल, साऊंड सिस्टीम आणि सहा वर्षांच्या मुलाच्या गळ्यातील सोन्याचा ताईत कापून नेला. चोरीला गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता

वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. चोरीच्या घटनांमध्ये तक्रारींची रीतसर नोंद घेऊन तपासाला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अलीकडेच वाकेश्वर येथेही चोरीची घटना घडली होती. त्यामुळे वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT