सातारा

Satara Krishna Sugar Factory: ‘कृष्णा’ तांत्रिक कार्यक्षमतेत देशात प्रथम

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; उच्च साखर उतारा विभागातील कामगिरीची दखल

पुढारी वृत्तसेवा

रेठरे बुद्रूक : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. २०२४-२५ च्या हंगामातील तांत्रिक कार्यक्षमतेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेसाठी कारखान्याला प्रथम राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कार्यक्षमता पुरस्कारांतर्गत हा बहुमान जाहीर करण्यात आला.

कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्याने राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेची छाप उमटवली आहे. कारखान्याने सादर केलेल्या कामगिरीच्या माहितीचे तज्ज्ञांकडून मूल्यांकन करण्यात आले. भारत सरकारच्या साखर विभागाच्या मुख्य संचालकांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने २०२४-२५च्या कार्यक्षमतेचे अंतिम निकाल निश्चित केले. त्यामध्ये कृष्णा कारखान्याची उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेसाठी प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

या पुरस्काराचे वितरण मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, जनपथ येथे होणार आहे. केंद्रीय मंत्री व राज्य मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात कृष्णा कारखान्याला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT