Koyna Dam full capacity
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेले कोयना धरण देखील आज (दि.२०) सकाळी पूर्ण क्षमतेने भरले. 105 टीएमसी पाणीसाठा या धरणामध्ये झालेला आहे. यामध्ये कण्हेर, उरमोडी, वीर धोम, बलकवडी ही धरणे देखील पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत.
दरम्यान जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेत शिवारासह रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहू लागले होते. शेतीसह वाहतुकीवरही याचा विपरीत परिणाम झाला. यामुळे शेती नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीन, हळद, कांदा, झेंडू इतर तरकारी पिकांमध्ये पाणी साठल्याने ही पिके पाण्यात बुडालेली आहेत. त्यामुळे शेतकर्यांना लाखोंचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचा चिखल झाला असून मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यातच बाजारपेठेमध्ये भाजीपाल्यांचे दर कोसळल्याने शेतकर्यांना पावसाचा व दरांचा असा दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे. हळद पिकामध्ये पाणी साठल्याने हळदीला कीड लागण्याची भीती शेतकर्यांतून व्यक्त होत आहे.