Satara News 
सातारा

Satara News : कोंडवेतील ओसाड डोंगरावर उभारणार फॉरेस्ट पार्क

वन विभागाचा संकल्प; निसर्ग पर्यटन मंडळाकडे प्रस्ताव सादर

पुढारी वृत्तसेवा

सागर गुजर

सातारा : येथील सातारा- मेढा- महाबळेश्वर रस्त्यावर कोंडवे गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या ओसाड डोंगराचे भाग्य उजळण्याचे काम वन विभागाने हाती घेतले आहे. या डोंगराच्या परिसरामध्ये फॉरेस्ट पार्क उभारला जाणार आहे. निसर्ग पर्यटन विकास प्राधान्यक्रम या अनुषंगाने हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो नागपूर येथील महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन मंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

सातारा तालुक्यातील कोंडवे हे गाव सातारा शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. या गावाच्या हद्दीमध्ये वन विभागाच्या मालकीचा डोंगर आहे. राज्य महामार्ग 58 च्या नजीकच हा डोंगर असून सध्याच्या परिस्थितीमध्ये वन विभागाने जतन केलेली झाडे काही प्रमाणात या डोंगरावर दिसतात. उर्वरित डोंगर उजाड आहे. या डोंगरालाच पर्यटनस्थळ बनवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

डोंगराच्या पायथ्याला पूर्वीॅ खोदलेली खाण असून त्यात आता सर्वच ऋतूंमध्ये मुबलक पाणी असते. या पाण्याचा वापर उद्यान फुलवण्यासाठी केला जाणार आहे. वनविभागाने तयार केलेल्या प्रस्तावानुसार या पार्कमध्ये प्रवेशासाठी भव्य असे प्रवेशद्वार असेल. पार्किंगची व्यवस्था असेल, निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी बसण्याची व्यवस्था तसेच नेचर री क्रिएशन सेंटर असेल. या नेचर पार्कमध्ये बॉटनिकल गार्डन, हनी बी पार्क, ऐतिहासिक स्टॅच्यू, फुलपाखरू उद्यान, रॉक कॅक्टस गार्डन, वॉच टॉवर, झुलता पूल गुलाबाची बाग, एडवेंचर पार्क, सेल्फी पॉईंट, ऑक्सीजन पार्क, योगा डेक, मेडिटेशन सेंटर, देव वृक्षवन, पादचारी मार्ग, नीम पार्क असे उपक्रम राबवले जाणार आहेत.

साताऱ्याचा देदीप्यमान इतिहास देखील शिल्परूपात पहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार, राज्याभिषेक सोहळा, छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक, महाराणी ताराराणी यांचा पराक्रम, अशी ऐतिहासिक शिल्पे देखील या फॉरेस्ट पार्कमध्ये बसवण्यात येणार आहे. 10.5 हेक्टर इतके क्षेत्र असून या निसर्ग पार्कसाठी 55 कोटी 7 लाख 53 हजार 828 रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.

कोंडवेत उभारणार नैसर्गिक जंगल

शहरालगत असलेले हे स्थळ दुर्लक्षित असे आहे. वन विभागाच्या ताब्यात असल्याने लोकांचा वावर या ठिकाणी कमीच असतो. ओसाड डोंगर असल्यामुळे या ठिकाणी दुर्मिळ प्रमाणात लोकांचा वावर असतो. आता वनविभागाच्या प्रयत्नातून या परिसरामध्ये नैसर्गिक जंगल फुलणार आहे. स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यात येणार असल्यामुळे निसर्ग संवर्धनाला बळकटी मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT