Satara Zilla Parishad 
सातारा

Satara Politics : तब्बल ३४ वर्षांनंतर ‘स्वीकृतची’ दारे खुली

मिनी मंत्रालयात प्रवेशासाठी इच्छुकांचे जोरदार लाॅबिंग : राजकीय रणांगणात चुरस

पुढारी वृत्तसेवा

खेड : जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बॅकेच्या निवडणुकीनंतर आता खरी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे ती झेडपीच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीची. या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांत इच्छुकांची लगबग वाढली असून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांतील इच्छुकांनी आपापल्या वरिष्ठ नेत्यांकडे लाॅबिंग सुरू केले आहे. ३४ वर्षांनंतर मिळणारी ही संधी अनेकांसाठी राजकीय कारकीर्दीतील महत्वाचा टप्पा ठरणार असल्याने 'मिनी मंत्रालयात' प्रवेशासाठी चुरस वाढली आहे.

राज्यात १९९२ नंतर जिल्हा परिषदांमधील स्वीकृत सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली होती. मात्र कायद्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येत असून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीतील स्वीकृत नगरसेवकांप्रमाणे आता जिल्हा परिषदा आणि तालुकास्तरावरील पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्त होणार आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे.

दरम्यान, निवडणुकीत थोडक्यात पराभव झालेल्यांनी किंवा उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी स्वीकृत सदस्यपदावर लक्ष केंद्रित केले आहे. अनेकांनी पक्षनेत्यांकडे शिष्टमंडळे नेऊन ताकद अजमावण्यास सुरूवात केली आहे. तालुका, जिल्हानिहाय राजकीय समीकरणे, गटबाजी, आणि स्थानिक नेतृत्वाची पसंती या साऱ्यांचा निवडींवर परिणाम होणार असल्याने पुढील काही दिवस राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. ग्रामीण सत्ताकारणात 'स्वीकृत ' या नव्या दारातून कोणाला संधी मिळते आणि कोणाची प्रतिक्षा वाढते, याकडे आता आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण सत्तासमीकरणात नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याने आपलीच वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT