Satara Crop Damage : पावसाअभावी खरीप पिके कोमेजली pudhari file photo
सातारा

Satara Crop Damage : पावसाअभावी खरीप पिके कोमेजली

कराड दक्षिणच्या डोंगरी भागात शेतकरी चिंतेत; चार दिवसांत पाऊस न झाल्यास हंगाम वाया जाण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

उंडाळे : कराड दक्षिणच्या डोंगरी भागात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या असून भुईमूग, सोयाबीन, भात, संकरित ज्वारी, सूर्यफूल, चवळी, मूग, विविध कडधान्ये तसेच नाचणीची पिके कोमेजू लागली आहेत. पिकांना सध्या पावसाची नितांत गरज असून, येत्या चार दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

कराड दक्षिणच्या डोंगरी भागातील येळगाव, येणपे, टाळगाव घोगाव, ओंड, नांदगाव, उंडाळे, तुळसण, सवादे, घराळवाडी गोटेवाडी, जिंती, अकाईवाडी, साळशरंबे ,महारुगडेवाडी, चोरमारेवाडी , या विभागातील बहुतांश खरीप शेती पावसावर अवलंबून आहे. यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने काहीशी साथ दिल्याने शेतकऱ्यांनी भुईमूग, सोयाबीन, भात, ज्वारी, नाचणी, कडधान्ये आदी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली.

पिकांची उगवण चांगली झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने या आशेवर पाणी फिरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पिकांची वाढ भरणी या महत्त्वाच्या अवस्थेत आहेत. मात्र, जमिनीतील ओलावा कमी व पाऊस नसल्याने पिके पाने सुकू लागली आहेत. अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या असून काही भागात पिकांची वाढ खुंटली आहे. विशेषतः डोंगरी व हलक्या जमिनीच्या भागात पावसाअभावी परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी माळराणावली पिके करपू लागली आहेत.

भुईमूग व सोयाबीन ज्वारीला पाण्याची मोठी आवश्यकता असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भात, नाचणी, संकरित ज्वारी तसेच चवळी, मूग आणि इतर कडधान्यांच्या पिकांवरही पावसाअभावी परिणाम होऊ लागला आहे. पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही, तर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

एकीकडे पिकांवर खर्च झालेला मोठा पैसा, तर दुसरीकडे पावसाच्या लहरीपणामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या छायेत आहेत. पिके वाचविण्यासाठी सध्या केवळ पावसाची प्रतीक्षा करण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी खरीप हंगामातील भुईमूग ज्वारी सोयाबीनला पाणी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे परंतु वाहणारे ओढे नाले ही आता आटू लागले आहेत यावर्षी पावसाळ्यातच ओढे नाले आटल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. आजच पावसाळ्यात पाण्याची ही स्थिती अशी असेल तर भविष्यात काय होणार ?असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

येत्या चार सहा दिवसांत समाधानकारक पाऊस झाला, तर सुकणाऱ्या पिकांना संजीवनी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाने आणखी दडी मारल्यास शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनानेही डोंगरी भागातील पिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT