खंडाळा : पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसीत वाहतूक कोंडीसह अन्य समस्या वाढल्याने २० कंपन्यांनी खंडाळ्यात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने खंडाळ्यात पायघड्या घातल्या आहे. या कंपन्यांना सर्व सुविधा देण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी महत्वाचे करार होणार आहे. या कंपन्या खंडाळ्यातील केसुर्डी एमआयडीसी परिसरात स्थलांतरीत होणार आहे. या उद्योगांचे नीरा व्हॅली असोसिएशनच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे.
चाकण परिसर हा राज्यातील महत्त्वाचा औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र, वाहतूक कोंडीसह इतर समस्यांमुळे येथील २० कंपन्यांचे खंडाळ्यात स्थलांतर होणार असल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिध्द केले होते. यावरून पुणे जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा झाल्या. मात्र, या कंपन्यांच्या चालक व मालकांनी पत्रकार परिषद घेत समस्यांमुळे स्थलांतर करत असल्याचे जाहीर केले. आता या कंपन्या खंडाळ्यातील केसुर्डी एमआयडीसीत जागेचा शोध घेत आहेत.
शनिवार, दि. १५ ऑगस्टच्या निमित्ताने जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून उद्योगांसाठी जागावाटप, औद्योगिक क्षेत्राच्या विकासासंदर्भातील नियोजन तसेच काही महत्त्वाची धोरणे निश्चित करण्याच्या दृष्टीने चर्चा होणार आहे. सातारा जिल्ह्यात अधिकाधिक उद्योग यावेत, त्यांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी औद्योगिक संघटनांकडूनही पाठपुरावा केला जात आहे.
चाकणमधील राजकीय आणि औद्योगिक वातावरणाचा परिणाम उद्योग व्यवसायावर होत असल्याने काही कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच खंडाळा तालुक्यातील केसुर्डी एमआयडीसी साताऱ्यासाठी नवी औद्योगिक संधी म्हणून पुढे येत आहे.
चाकणमधील उद्योग साताऱ्यात येत असल्याने स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याबरोबरच पूरक उद्योग, वाहतूक, सेवा व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातील उद्योगांचे साताऱ्यात होणारे हे स्थलांतर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
केसुर्डी एमआयडीसीकडे चाकणमधील उद्योगांचा वाढता कल सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक वाटचालीसाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे. पुण्याच्या औद्योगिक पट्ट्यातील उद्योग साताऱ्याकडे वळत असतील, तर या संधीचा फायदा घेऊन साताऱ्याला आगामी काळात मोठे औद्योगिक केंद्र बनवण्याचे आव्हान जिल्हा प्रशासन आणि उद्योग विभागासमोर आहे.