Accident Pudhari
सातारा

Satara Accident : खंडाळ्यात दुचाकी-टेम्पोची समोरासमोर धडक; एक ठार

सुखेड परिसरात हळहळ व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

खंडाळा : खंडाळा–धावडवाडी मार्गावरील काच कंपनीजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुचाकी आणि छोटा टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघे जखमी झाले. त्यापैकी सुखेड (ता. खंडाळा) येथील विशाल बाळू गुलदगड (वय ३२) यांचा शिरवळ येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे सुखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजेशकुमार रामकल्याण सिंह (वय ३९, रा. धावडवाडी) हे दुचाकीवरून खंडाळ्याकडून धावडवाडीकडे जात होते. खंडाळा-धावडवाडी मार्गावरील काच कंपनीजवळील वळणावर समोरून आलेल्या टेम्पो (एमएच ११ डीव्ही १००३) ने त्यांच्या दुचाकीला (एमएच ११ सीके २०११) जोरदार धडक दिली. या धडकेत ब्रिजेशकुमार सिंह आणि विशाल गुलदगड हे दोघे जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी शिरवळ येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान विशाल गुलदगड यांची प्राणज्योत मालवली.

या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी ब्रिजेशकुमार सिंह यांच्या फिर्यादीवरून टेम्पो चालक प्रणव सोमनाथ पवार (वय ३२, रा. सुखेड, ता. खंडाळा) याच्याविरुद्ध खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार संजय जाधव तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT