खंडाळा : पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यात रस्त्यात बंद पडलेल्या ट्रेलरला पाठीमागून आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात आयशर चालक अशोक ठोंबरे (वय ४५, रा. शिरवळ) गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी जोगळेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ठोंबरे हे दुपारी तीनच्या सुमारास आयशर टेम्पोमधून साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात होते. खंबाटकीच्या नवीन बोगद्यात प्रवेश करत असताना उजव्या बाजूला लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रेलर बंद पडल्याने रस्त्यात उभा होता. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोची ट्रेलरला जोरदार धडक झाली. धडकेमध्ये आयशर चालक ठोंबरे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमी ठोंबरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.