सातारा : रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पुणे-मुंबईसह अन्य जिल्ह्यातील पर्यटकांनी कास पठारावरील फुले पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे सातारा-कास मार्गावर वाहतूक कोंडी झाली. 4 ते 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
जागतिक वारसास्थळ म्हणून असलेल्या कास पठारावर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. कास पठारावरील विविध रंगी फुलांच्या छटा पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच येत असतात. कास पठारावरील फुले पाहण्यासाठी शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी पुणे, मुंबई यासह अन्य जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणचे पर्यटक हजेरी लावत असतात. त्यामुळे रविवारीही कास पठार, यवतेश्वर, बामणोलीकडे पर्यटकांची गर्दी झाली होती. अनेक पर्यटक कास परिसरात मुक्कामी राहत असतात. रविवारी सातारा-कास मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. सातारा-कास मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस व नागरिक मदत करत होते.
शनिवार, रविवार अन्य सुट्टीच्या दिवशी होणार्या वाहतूक कोंडीमुळे कास परिसरात असणार्या स्थानिक नागरिकांना त्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. त्यासाठी प्रशासनाने वाहतूक कोंडीवर योग्य मार्ग काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.