बामणोली : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कासपुष्प पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसानंतर पठारावर पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. रविवारी विकेंडला पठार पर्यटकांनी हाऊसफुल झाले. दरम्यान, गणेशोत्सवादरम्यान पठारावर फुलांचे गालिचे आणखी बहरणार आहेत.
कास पठारावर फुलांचे गालिचे बहरण्यास सुरूवात झाली आहे. पर्यटकही गर्दी करत आहेत. रविवारी सातारा येथील सातारा हिल हाफ मॅरेथॉन असल्याने सकाळच्या सत्रात पठारावर येणाऱ्या पर्यटकांनी अल्प प्रमाणात ऑनलाइन बुकिंग केले तर दुपार व सायंकाळच्या सत्रात तब्बल १८३४ पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंग करून पठारावर हजेरी लावली.
सकाळी ११ पर्यंत पठारावर गर्दीचे प्रमाण हे कमी होते मात्र सातारा हिल हाफ मॅरेथॉन संपल्यानंतर दुपार व सायंकाळच्या सत्रात पठारावर पर्यटकांनी खूप मोठ्या प्रमाणावर फुले पाहण्यासाठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. साधारणपणे एक हजारहून अधिक पर्यटकांनी पठारावर ऑफलाईन पद्धतीने समक्ष जाऊन फुले पाहण्याचा आनंद लुटला.
कास पुष्प पठारावरील फुले पाण्यासाठी आलेल्या एका महिला पर्यटकाच्या मदतीसाठी बामणोली आरोग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिका धावल्याचे पहावयास मिळाले. प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी तिला रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा या ठिकाणी दाखल करण्यात आले.
चवर फुलले, वायतुरा, सितेची आसवे, गुलाबी तेरडा उमलायला लागली
पठारावर सद्यस्थितीत चवर या फुलांनी संपूर्ण पठर फुलून गेले असून त्याच्या जोडीला सातारी वाय तुरा, सितेची आसवे, गुलाबी तेरडा (गौराईची फुले),सोनकी, गेंद, कंदील पुष्प, कुमोदिनी तलावात कुमुदिनी आदी छोट्या-मोठ्या प्रकारची फुले उमलायला सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यामध्ये गणेशोत्सव सुरू होत असल्याने या कालावधीत पठारावर येणाऱ्या पर्यटकांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे.