Kas Plateau 
सातारा

Kas Plateau : कास पठारावरील फुलांच्या बियांचे संकलन

पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण : वन विभागाचे चाललंय काय?

पुढारी वृत्तसेवा

बामणोली : सातारा जिल्ह्याचे वैभव असलेल्या कास पुष्प पठाराला सन २०१२ मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला. मात्र, आता कास पठारावरील विविध प्रजातींच्या फुलांच्या बियांचे संकलन करून महाराष्ट्रात इतर ठिकाणीही अशी फुले उगवण्याचे प्रयोग करण्याच्या हालचाली वनविभागाकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे. या प्रकाराबाबत पर्यावरणप्रेमी व स्थानिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून बिया संकलित करण्यामागचा हेतू समोर आला पाहिजे, अशी मागणी होवू लागली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास राव हे नागपूर येथून कास पुष्प पठारावरील फुले पाहण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पठारावर आढळणाऱ्या विविध प्रजातींच्या फुलांची माहिती घेतली. त्यानंतर या परिसरातील फुलांची माहिती असलेले बामणोलीचे माजी वनपाल श्रीरंग शिंदे यांना त्यांनी नागपूर येथे बोलावून घेतले होते. या दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर सातारा वनविभागाला पत्रव्यवहार करून कास पठारावर उमलणाऱ्या फुलांच्या बिया संकलित कराव्यात आणि त्या इतर ठिकाणी उगवता येतात का? याबाबत प्रयोग करावेत, अशा सूचना दिल्याचे वनविभागातील काही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत श्रीरंग शिंदे यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. आपल्याला त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी बोलावण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, याच अनुषंगाने सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह कास पठार परिसरात माजी वनपाल श्रीरंग शिंदे यांच्या समवेत विविध फुलांच्या बियांचे संकलन करताना दिसून आले. त्यामुळे वनविभागाकडून सुरू असलेल्या या कामामागील नेमका उद्देश काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बिया यासाठी गोळा करणे आवश्यक आहे की बऱ्याच ठिकाणी कमी जर्मिनेशन होत आहे. तसेच पठारावर बऱ्याच ठिकाणी पॅचेस देखील तयार होत आहे. गॅप तयार होत आहे हे बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. बिया गोळा करून त्या ठिकाणी आपण त्या रिप्लिकेट करणार. ज्या ठिकाणी फुल येत नाहीत अशा ठिकाणी बिया टाकणार. थोडेफार सॅम्पल वरती मागितलेले आहेत अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पाठवणार. राज्यस्तरावरून मागणी असल्याने त्या अभ्यासासाठी थोड्याफार प्रमाणात द्याव्या लागणार आहेत. कास पठार अजून चांगली झाली पाहिजे यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.
- अमोल सातपुते, सातारा उपवनसंरक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT