सातारा : करंजे नाका, सातारा येथे बुधवारी सायंकाळी गॅरेज दुकानात घुसून तीन ते चार संशयितांनी कोयत्याने हल्ला केला. कोयत्याच्या मुठीने हल्ला झाल्याने एकजण जखमी झाला. कोयत्याची दहशत पाहून नागरिकांनी एका हल्लेखोराला पकडून चोप दिला. याचवेळी पोलिस आल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, अक्षय गाडे असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. ते गॅरेजमध्ये काम करत असताना तेथे चौघांची टोळी आली. सुरुवातीला वादावादी केल्यानंतर त्यातील एकाने अचानक कोयता काढून दहशत माजवली. आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिक जमू लागले. चौघेजण एकाला मारहाण करत असल्याचे पाहून नागरिकांनी हस्तक्षेप केला. हल्लेखोर दहशत माजवू लागल्याने अखेर नागरिकांनी एकाची गचांडी धरली. यानंतर इतर संशयित तेथून पसार झाले. दरम्यान, जखमी युवकाला नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले. करंजे नाका परिसरातील या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर पोनि सचिन म्हेत्रे यांच्यासह पोलिस तेथे पोहचले. संतप्त नागरिक एकाची धुलाई करत असल्याचे पाहून पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन करुन संबंधित युवकाला ताब्यात घेतले. यावेळी नागरिक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. मुख्य रस्त्यावरच सुमारे 15 मिनिटे गोंधळ सुरु होता. पोलिसांनी संशयित एकाला पकडून त्याला ताब्यात घेतले. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.