खंडणीचा गुन्हा Pudhari News Network
सातारा

Satara Crime| खंडणीस नकार दिल्याने वाहन चालकास मारहाण; संशयित ताब्यात

कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न; कोल्हापूर नाका परिसरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

कराड : वाहनात प्रवासी भरायचे असतील तर दरवेळी दोन हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देत वाहनचालकाकडून जबरदस्तीने पैसे उकळण्याचा प्रकार कराडच्या कोल्हापूर नाका परिसरात घडला. मागितलेली खंडणी देण्यास नकार दिल्याने संबंधित वाहनचालकावर लाकडी दांडक्यांनी हल्ला करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला. गुरुवारी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सौरभ संजय जाधव (वय २६, मूळ रा. टेंभू, ता. कराड, सध्या रा. घणसोली, नवी मुंबई) यांनी याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमात बस वाहक म्हणून नोकरीस आहेत. दिवाळीनिमित्त ते इर्टिगा कारमधून टेंभू येथे आले होते. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबईला परत जात असताना कोल्हापूर नाका येथे एका व्यक्तीने हात करून त्यांची गाडी थांबवली. त्याचवेळी दुसऱ्या व्यक्तीने झायलो कार आडवी लावून जाधव यांच्या वाहनाची चावी काढून घेतली.

कोल्हापूर नाका परिसरात प्रवासी भरायचे असतील तर दोन हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा गाडीची चावी मिळणार नाही, अशी धमकी देण्यात आली. भविष्यात प्रत्येक वेळी कराडमध्ये वाहन भरताना दोन हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल, असेही बजावण्यात आले. जाधव यांनी विरोध केला असता संशयिताने त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर झालेल्या वादात तुला बघून घेतो, अशी धमकी देत संशयित तेथून निघून गेला.

मात्र, दुपारी पावणेतीनच्या सुमारास संबंधित संशयित चार ते पाच साथीदारांसह पुन्हा घटनास्थळी आला. टोळक्यातील एकाच्या हातात कुऱ्हाड, तर इतरांच्या हातात लाकडी दांडके होते. त्यांनी पुन्हा दोन हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली. जाधव यांनी पैसे देण्यास नकार देत यापूर्वी जबरदस्तीने घेतलेले दोन हजार रुपये परत मागितले. याचा राग आल्याने टोळक्याने त्यांच्यावर दांडक्यांनी हल्ला चढविला.

हा प्रकार सुरू असताना त्यांचे मित्र तानाजी पाटील, अजिंक्य सुतार आणि सूरज पवार घटनास्थळी धावून आले. त्यांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र टोळक्याचा आक्रमक पवित्रा कायम होता. मित्रांच्या सांगण्यावरून जाधव यांनी तेथून काढता पाय घेत थेट कराड शहर पोलीस ठाणे गाठले. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, संशयितांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT