सातारा

Satara News : कराड - ढेबेवाडी चौपदरी रस्त्याला अवकळा !

११० कोटींच्या कामानंतरही ठिकठिकाणी खड्डे; निकृष्ट कामाच्या ठिकाणी पुनर्बांधणीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

ढेबेवाडी : कराड-ढेबेवाडी या सुमारे २५ किलोमीटर अंतराच्या मार्गाचे तब्बल ११० कोटी रुपये खर्चून चौपदरीकरण करण्यात आले. मात्र, काम पूर्ण होऊन काही वर्षे लोटताच निकृष्ट काम झालेल्या ठिकाणी रस्ता उखडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने संपूर्ण मार्गाची पाहणी करून उखडलेल्या भागांची तातडीने पुनर्बांधणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक, शेतकरी व वाहनचालकांमधून पुन्हा जोर धरू लागली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या दहा वर्षांत या मार्गावरील विविध कामे पूर्ण झाली आहेत. चौपदरीकरण करताना संपूर्ण जुना रस्ता उखडून मुरूमी करणापासून डांबरीकरणापर्यंत सर्व स्तरांवर दर्जेदार काम होणे अपेक्षित होते. मात्र, काही ठिकाणी पूर्वीचा डांबरी रस्ता तसाच ठेवून त्याच्या बाजूचा भाग गटारापर्यंत खडीकरण करून त्यावर डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे रस्त्याची मजबुती व टिकाऊपणा यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चौपदरी करणाच्या वेळी स्थानिक नागरिक, शेतकरी, सरपंच व संबंधित लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुधारणा करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात काही ठिकाणी अपेक्षित दर्जाचे काम झाले नसल्याने रस्ता खड्डेमय होऊन उखडत चालला आहे. त्यामुळेच या मार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्गापैकी एक मार्ग असणाऱ्या या मार्गाकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.

पाहणी करून दुरूस्‍ती व्‍हावी...

मानेगाव ओढा ते खळे फाटा या दीड किलोमीटर अंतरात रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला असून, या भागात वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विभागाने तातडीने सर्वेक्षण करून दोषपूर्ण कामांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT