Rain Update Pudhari
सातारा

Satara Rain: कण्हेरीत ढगफुटीसदृश पाऊस; अतिट येथे गाय ठार

खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागात शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरशः धुमाकूळ घातला

पुढारी वृत्तसेवा

खंडाळा : खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागात शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरशः धुमाकूळ घातला. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे कण्हेरी परिसरातील डोंगररांगांवर ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली. अवघ्या काही मिनिटांत ओढे-नाले दुथडी भरून वाहिले. अतिट येथे वीज केसळून गाय ठार झाली.

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले होते. शुक्रवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन मांढरदेव परिसरात काळ्या ढगांनी गर्दी केली. त्यानंतर वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही क्षणांतच कण्हेरीच्या डोंगरमाथ्यावर मुसळधार पावसाने तुफान बरसात केली. डोंगरावरील पाण्याचे प्रवाह वेगाने खाली उतरल्याने ओढ्यांना पूर आला.

अचानक कोसळलेल्या पावसामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली. कण्हेरी परिसरातील विटभट्ट्यांवर तयार करण्यात आलेल्या कच्च्या विटांवरील संरक्षणासाठी टाकलेले कागद वादळी वाऱ्याने उडून गेल्याने हजारो विटा भिजून मोठे नुकसान झाले. दरम्यान, अतिट येथे गोठ्याजवळ बांधलेल्या गाईवर वीज कोसळल्याने ती जागीच ठार झाली. शेतकरी रामदास राजाराम जाधव यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. असवली, कण्हेरी, लोहोम आणि परिसरातील गावांमध्येही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शेतकरी, व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT