सातारा : जिल्ह्यात मान्सूनचा प्रवास अद्याप अडखळतच राहिला असून मंगळवारी पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये अधूनमधून हलक्या सरी कोसळल्या. आभाळ दिवसभर काळवंडून राहिले तरी दमदार पाऊस काही झालाच नाही. त्यामुळे बळीराजाची चिंता कायम आहे. जुलै महिना उजाडल्यानंतरही मान्सूनला सूर गवसत नसल्याने शिवाराशिवारांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. दरम्यान, सातारा तालुक्यात ३.७ मि.मी. तर महाबळेश्वरमध्ये ३६.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासूनच आभाळ काळवंडलेले राहिले. त्यामुळे दमदार पाऊस पडेल, अशी आशा लागून राहिली होती. मात्र, बहुतांश ठिकाणी केवळ हलक्या सरी कोसळल्या. दुपारी एकच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. तासभर पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर अधूनमधून पावसाची भुरभूर अन् ढगाळ हवामानामुळे पावसाळी माहोल राहिला.
‘अल निनो’च्या परिणामामुळे यावर्षी पावसाळा कमी असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गत आठवड्यापासून जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला, तरी सातत्य नसल्याने शेतीची पेरणी खोळंबली आहे. एक-दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी धूळवाफेवरील पेरण्यांना प्रारंभ झाला आहे.
मंगळवारी दिवसभरात जावली ६.१ मि.मी., पाटण १०.५ मि.मी., कराड ७.८ मि.मी., कोरेगाव १.६ मि.मी., खटाव ०.७ मि.मी., माण ४.५ मि.मी., फलटण ६.४ मि.मी., खंडाळा २.८ मि.मी., वाई ६.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, दुपारनंतर ढगाळ हवामानामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. ग्रामीण भागात पेरणीपूर्व मशागतींना वेग आला आहे. मात्र, अद्यापही पेरणीपूरक पाऊस झाला नसल्याने बळीराजाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.