कराड : शिवाजी विद्यापीठअंतर्गत शिकविल्या जाणार्या बॅचलर ऑफ जर्नलिझम (बी.जे.) अभ्यासक्रमाच्या मागील 2024/25 या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा अद्याप झाल्या नाहीत. त्यामुळे बी.जे.चे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे बोलले जात आहे. बी.जे.चा अभ्यासक्रम तयार करणारे अभ्यास मंडळ व परीक्षा विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे, तर विद्यार्थ्यांच्या होणार्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिवाजी विद्यापीठअंतर्गत कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठामध्ये व कराड येथील शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात बीजेचा अभ्यासक्रम शिकविला जातो. या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊन आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपला नावलौकिक मिळवला आहे. कराड येथील बापूजी साळुंखे महाविद्यालयातील बी.जे.चा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी आज विविध वृत्तपत्र, तसेच न्यूज चॅनलमध्ये करिअर करत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून त्यांना पत्रकारितेच्या क्षेत्रात नोकरीची संधी मिळावी हा उद्देशाने कराडमध्ये बी.जे. या अभ्यासक्रमाचा कोर्स गेली अनेक वर्षापासून शिकवला जात आहे.
गत 2024 - 25 या शैैक्षणिक वर्षासाठी शिवाजी विद्यापीठ व बापूजी साळुंखे महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. मात्र या शैक्षणिक वर्षासाठी ऑक्टाबर 2024 मध्ये होणारी परीक्षा अद्यापही झालेली नाही. त्यामुळे मार्च 2025 मध्ये होणार्या परीक्षेचा तर प्रश्नच उद्भवत नाही. या दोन्हीही परीक्षा अद्याप घेतल्या नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या परीक्षा होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात असून आम्हाला पत्रकारितेची पदवी केंव्हा मिळणार असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
याबाबत येथील शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन आम्ही कोल्हापूर येथील परीक्षा मंडळाशी संपर्क साधला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून लवकरात लवकर परीक्षा घ्यावी अशी विनंती त्यांना केली आहे. मात्र परीक्षा मंडळाच्या म्हणण्यानुसार बी. जे. चा अभ्यासक्रम तयार करणार्या अभ्यास मंडळाकडूनच अद्याप अभ्यासक्रम तयार करण्यात आला नसल्याने कोणत्या अभ्यासक्रमाच्या आधारे प्रश्नपत्रिका तयार करायची? प्रश्नपत्रिका तयार करणार्या प्राध्यापकांना कोणता अभ्यासक्रम देऊन प्रश्नपत्रिका तयार करा असे सांगायचे? असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. त्यामुळे अभ्यास मंडळाने बी. जे. चा अभ्यासक्रम का तयार केला नाही? तो विद्यापीठ आणि महाविद्यालयाला का दिला नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अभ्यास मंडळांनी अभ्यासक्रम तयार केला आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाचे असताना प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले का? असा प्रश्नही या निमित्ताने विचारला जात आहे.
कराड येथे शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयामध्ये बी.जे.चा अभ्यासक्रम शिकविला जातो. या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी यशस्वी झाले असून आपले करिअर घडवत आहेत. 2024/25 शैक्षणिक वर्षाची बी.जे.ची परीक्षा अद्याप झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मी स्वतः परीक्षा मंडळाला संपर्क साधला आहे. त्यांनी लवकरच परीक्षा घेतली जाईल, असे सांगितले आहे.प्राचार्य सतीश घाडगे, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड