कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील भाडळे येथे गुरुवर्य स्व. लक्ष्मणरावजी इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत महत्त्वाच्या कामांचा आरंभ शुक्रवारी होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते योजनेच्या या महत्त्वाच्या टप्प्याचे भूमिपूजन होणार आहे. आ. महेश शिंदे यांच्या प्रयत्नाने दुष्काळी भागाला कायमस्वरूपी सिंचनाची जोड देणाऱ्या या योजनेमुळे कोरेगाव तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.
आ. महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गती मिळालेल्या गुरुवर्य स्व. लक्ष्मणरावजी इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत भाडळे उपसा योजनेचे तसेच रामोशीवाडी ते भाडळे आणि भाडळे ते नलवडेवाडी या थेट नलिका योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास आ. महेश शिंदे, जि. प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. या योजनेला राज्य शासनाने सुमारे २२०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून विविध उपसा केंद्रे, पाइपलाईन, वितरण व्यवस्था आणि सिंचन सुविधा उभारण्यात येत आहेत.
योजनेचे काम पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर कोरेगाव तालुक्यातील सुमारे ९८ टक्के भूभाग सिंचनाखाली येणार आहे. जिहे-कठापूर योजनेला गती मिळवून देण्यासाठी आ. महेश शिंदे यांनी विधानसभा सदस्य होण्यापूर्वीपासून सातत्याने पाठपुरावा केला.
सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असून, ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधींमध्येही वाढ होणार आहे. दुष्काळमुक्त कोरेगावचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने भाडळे येथे होणारा हा आरंभ केवळ एका प्रकल्पाचा कार्यक्रम नसून, कोरेगाव तालुक्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.