सातारा

Satara Politics : जयकुमार गोरे-रामराजे यांच्यात रंगला गप्पांचा फड

महायुतीच्या मेळाव्यात जिल्हा बँकेसाठी राजकीय सूर

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राजकारणात कायमस्वरूपी कोणी कोणाचा मित्र किंवा विरोधक नसतो, याचा प्रत्यय साताऱ्यातील महायुतीच्या मेळाव्यात आला. गेल्या काही वर्षांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर आणि हे शेंद्रे येथील मेळाव्यात शेजारी-शेजारी बसले. एवढेच नव्हे, तर दोघांमध्ये बराच वेळ गप्पांचा फडही रंगला. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा सुरू झाली आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पुढाकाराने शेंद्रे येथील स्व. श्री. छ. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुलात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीतील घटक पक्षांच्‍या मतदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या निमित्ताने महायुतीच्या नेत्यांनी एकत्र येत निवडणुकीच्या रणनीतीची दिशा स्पष्ट केली. मात्र, मेळाव्यातील राजकीय घडामोडींमध्ये सर्वाधिक लक्ष वेधले ते आ. रामराजे नाईक-निंबाळकर आणि ना. जयकुमार गोरे यांच्या संवादाने. गेल्या काही वर्षांत जिल्ह्याने या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष आणि आरोप-प्रत्यारोप अनुभवले आहेत. त्यामुळे एकाच व्यासपीठावर शेजारी बसून दोघांनीही मनमोकळ्या गप्पा मारल्याचे चित्र उपस्थितांसाठी औत्सुक्याचा विषय ठरले.

महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेनुसार जिल्हा बँकेतील पाच जागा भाजपला, तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि दोन जागा शिवसेनेला सोडण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील जागा रामराजे गटाला, विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातील जागा जयकुमार गोरे यांच्या समर्थकाला, तर इतर मागास प्रवर्गातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. या समीकरणांमुळे परस्परविरोधी राजकीय भूमिका घेणाऱ्या नेत्यांनाही आता एकमेकांच्या सहकार्याची गरज भासू लागली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात राजकीय संघर्षासाठी ओळखले जाणारे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे चित्र महत्त्वाचे मानले जात आहे. निवडणुकीतील जागावाटप, राखीव प्रवर्गांतील मतांची जुळवाजुळव आणि महायुतीतील समन्वय या पार्श्वभूमीवर या भेटीकडे पाहिले जात आहे.

निवडणुकीपुरते राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करण्याची भूमिका घेतली जाणार का? हे आगामी घडामोडींवरून स्पष्ट होईल. या मेळाव्याला ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. मकरंद पाटील, आ. धैर्यशील कदम, माजी आमदार दीपक चव्हाण, जि. प. उपाध्यक्ष राजूभय्या भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हा बँकेचे संचालक काका धुमाळ, माजी सभापती सुनील काटकर, अविनाश कदम, बाळासाहेब सोळसकर यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT