सातारा

Jaykumar Gore | जिहेकठापूर आठमाही करण्याचे मिशन सुरु : ना. जयकुमार गोरे

दुष्काळमुक्तीसाठीचे परिश्रम यशस्वी झाल्याचे समाधान

पुढारी वृत्तसेवा

खटाव : माण - खटावच्या अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी म्हणावी तशी सकारात्मकता न दाखवल्याने या भागाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मला पायापासून सुरुवात करावी लागली. रात्रंदिवस केलेल्या खडतर परिश्रमामुळे माझा दुष्काळ मुक्तीचा संकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. आज दोन्ही तालुक्यात येणाऱ्या शाश्वत पाण्याला जयकुमार फक्त निमित्त आहे. इथल्या स्वाभिमानी जनतेने चार वेळा माझ्यावर विश्‍वास दाखवला म्हणूनच पाणी आणण्याचा शब्द पूर्ण करु शकलो. आता जिहे-कठापूर योजना आठमाही करण्याचे मिशन हाती घेतले आहे, असे प्रतिपादन ना. जयकुमार गोरे यांनी केले.

मुळीकवस्ती येथे गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या पाणीपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, अरुण गोरे, नगराध्यक्षा वर्षाराणी सावंत, संजय गांधी, अतुल जाधव, डॉ. संदीप पोळ, नंदकुमार मोरे, बाळासाहेब सावंत, कार्यकारी अभियंता अमर काशीद, अभियंता अमोल निकम, महेश जाधव, सिध्दार्थ गुंडगे, रुपेश मोरे, नानासाहेब दोलताडे, अकिल काझी आणि भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

ना. गोरे पुढे म्हणाले, मी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करत उरमोडी, जिहेकठापूर, तारळी योजनांचे पाणी आणू शकलो. माण तालुक्याच्या उत्तर भागात पाणी येईल असे कुणालाच वाटले नव्हते. जिहेकठापूरचे आंधळी धरणात आणलेले पाणी उचलून या भागाला देण्याची वाढीव योजना पूर्णही करण्यात आली. बिजवडी, पांढरवाडी, कारखेल, कुळकजाई, हवालदारवाडी या पट्ट्यासाठी ६९० कोटींची योजना नियोजित आहे. सोळशी धरणासाठीही आमचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले आहेत. आता लवकरच ५२ गावांना टेंभूचे पाणी येणार असल्याने या दोन योजनांवरील ताण कमी होवून मुबलक पाणी मिळणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

कलियुगातही शकुनी आहेत

माण - खटावमध्ये येणाऱ्या पाण्याला विरोध करणाऱ्या शकुनी मामाच्या औलादी आजच्या कलियुगात आहेत हे दुर्दैवी आहे. गेल्या १७ वर्षात अनेक जण माझा पराभव करायला पैसा पाणी घेऊन आले. एकाचा करंट गेला की दुसरा येतो. इथल्या स्वाभिमानी जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्‍वास मी सार्थ करुन दाखवला आहे, असेही ना. गोरे म्‍हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT