मेढा : जावलीच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या मोर्चे, प्रतिमोर्चे, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय संघर्षाच्या आतिषबाजीला आतिष कदमच जबाबदार आहेत. विजयी मिरवणुकीत राडा करण्यासाठी त्यांच्या आकांनी फोन करून सांगितल्यानेच पुढील सर्व घटनांना सुरुवात झाली, असा खळबळजनक आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केला. मेढा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
मेढा पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, उपसभापती गोरख महाडिक, नगराध्यक्षा रूपाली वारागडे, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई गिरी, उपनगराध्यक्ष विकास देशपांडे, भाजप मंडल अध्यक्ष मारुती चिकणे, संदीप परामणे, रविंद्र परामणे,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. शिवेंद्रराजे म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर झालेल्या कोणत्याही जल्लोषात मी सहभागी नव्हतो. तरीदेखील माझे नाव घेऊन टीकाटिप्पणी केली जात आहे. विरोधकांकडून दहशतीचे आरोप केले जातात; मात्र वीस वर्षे आमदार म्हणून काम करताना मी कधीही दहशत किंवा दादागिरीचे राजकारण केले नाही. मग बाहेरचे काही लोक आल्यानंतरच जावलीत असे प्रकार का घडू लागले, याचा विचार विरोधकांनी करावा. पालकमंत्र्यांना आणून ताकद दाखविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
जिल्हा परिषदेतील अपयशानंतर भाजपकडून कोणतेही चुकीचे पाऊल उचलण्यात आले नाही. मात्र, ज्ञानदेव रांजणे यांच्या विजयानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा सर्व बनाव रचल्याचा आरोप त्यांनी केला. छत्रपतींचा वारसा आम्हाला शिकविण्याचा प्रयत्न करू नये. माझी वंशावळ सांगण्याची किंवा कोणाकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. मला कोणी तत्त्वज्ञान शिकवू नये, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.
निवडणुका आल्या की जावळीचा स्वाभिमान जागा होतो आणि निवडणुका संपल्या की तोच स्वाभिमान मुंबईला जातो, अशी बोचरी टीका त्यांनी केली. जावळीतील जनतेची कामे करून त्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. पहिल्या निवडणुकीत पराभव झाला, त्यातून धडा घेतला आणि पुढील वाटचाल विजयाच्या दिशेने केली. १९७८ पासून आमचे घराणे राजकारणात आहे. वडिलांपासून आम्हाला संपविण्याचे प्रयत्न करणारेच संपले; मात्र आम्ही आजही जिथे होतो तिथेच ठाम आहोत. माझ्यासोबत असणारा कार्यकर्ता मी जपतो. तो अडचणीत असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
बोंडारवाडी धरणाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक टीएमसी पाण्याच्या मंजुरीसाठी मीच पुढाकार घेतला आहे. प्रत्येक निवडणुकीत बोंडारवाडी धरणाचे गाजर दाखवून मते मागायची आणि प्रत्यक्षात प्रश्न भिजत ठेवायचा, हे विरोधकांचे धोरण आहे. निवडणुकीत दिलेली आश्वासने विरोधकांनी किती पूर्ण केली, याचाही हिशेब जनतेसमोर मांडावा. दुसऱ्यांवर शिंतोडे उडविण्यापेक्षा विकासकामांवर बोलावे, असे आव्हान त्यांनी दिले.
प्रत्येकाला आपल्या बुद्धीचा वापर करून मोठे होण्याचा अधिकार आहे. कोणाच्या व्यवसायावर बोलताना व्यवसाय करणे गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारी नियमांनुसार कर भरून कोणी व्यवसाय करत असेल तर त्याबाबत आक्षेप घेण्याचे कारण काय, असेही त्यांनी स्पष्ट केले. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे स्मारक त्यांच्या मूळ गावी व्हावे, यासाठी पहिली बैठक माझ्या पत्रावरून घेण्यात आली. मुंबईऐवजी मूळ गावी स्मारक उभारण्यासाठी मीच प्रयत्न केले. सुरुवातीला पाच कोटींची मान्यता असताना ती वाढवून १३ कोटी रुपये करण्यात आले असून लवकरच भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
दुष्काळ जाहीर झाला नाही तर ते शिवेंद्रसिंहराजे यांचे अपयश आणि दुष्काळ जाहीर झाला तर त्याचे श्रेय आम्ही घेतले, अशी विरोधकांची भूमिका आहे. म्हणजे अपयश आमचे आणि चांगले झाले की श्रेय त्यांचे, ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.