सातारा

Satara News: जावलीच्या शिवारात भातलागणीला वेग

यंदा मान्सूनने जावली तालुक्यावर कृपादृष्टी ठेवली असून उशिरा का होईना समाधानकारक पावसामुळे भातलागणीच्या कामांना चांगलाच वेग आला

पुढारी वृत्तसेवा

मेढा : यंदा मान्सूनने जावली तालुक्यावर कृपादृष्टी ठेवली असून उशिरा का होईना समाधानकारक पावसामुळे भातलागणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. तालुक्यातील मेढा, केळघर, कुसुंबी, बामणोली, चिकणवाडी, सांगवीमुरा, कुसुंबीमुरा आदी भागांतील शेतशिवारात सध्या भातलागणीची लगबग सुरू असून शेतकरी कुटुंबे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतीच्या कामात व्यस्त आहेत.

जावलीत सध्या पडत असलेल्या पावसामुळे भाताचे तरवे जोमदार तयार झाले आहेत. शेतात पाण्याची पुरेशी उपलब्धता असल्याने लागवडीची कामे सुरळीत सुरू असून अनेक ठिकाणी भातलागवड पहिल्या टप्प्यात पोहोचली आहे. महिला-पुरुष शेतमजूर आणि शेतकरी पारंपरिक पद्धतीने भातलागण करत असल्याने संपूर्ण परिसरात कृषी कामांची लगबग पाहायला मिळत आहे.

जावली तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम पट्ट्यात भात हे प्रमुख खरीप पीक असून यंदा अनुकूल हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांतील अनिश्चित पावसामुळे निर्माण झालेली चिंता यंदा काही प्रमाणात जाणवली होती परंतू जुलैच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे पेरणीला व भातलागण सुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे पुढील काही दिवस पावसाचा संतुलित जोर कायम राहिल्यास भातपिकाच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होईल.

त्यामुळे वेळेवर खत व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि पिकाची नियमित पाहणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. जावली तालुक्यातील शेतशिवार पुन्हा एकदा हिरवाईने नटू लागले असून भातलागणीच्या गडबडीत ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT