सातारा : राज्य शासनाने जलसंपदा विभागात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. सातारा पाटबंधारे विभागाची पुनर्रचना केली असून, सातारा सिंचन मंडळ हे सातारा प्रकल्प मंडळात विलीन झाले आहे. सातार्यात जलविद्युत मंडळ स्वतंत्रपणे अस्तित्वात आले असून, या सर्कलकडे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व विद्युत प्रकल्पाची जबाबदारी दिली आहे. जूनपासून या दोन्हीही मंडळांचे कामकाज शासन निर्णयानुसार सुरू झाले आहे.
नव्याने अस्तित्वात आलेल्या जलविद्युत प्रकल्प मंडळाचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे राहणार आहे. जलविद्युत प्रकल्प मंडळाकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील १६ जलविद्युत प्रकल्पांची जबाबदारी राहणार आहे. जलविद्युत प्रकल्पांची देखभाल व दुरूस्ती, नूतनीकरण, पंपड् स्टोरेज स्कीम बांधकाम, कोयना डॅम टू पॉवरहाऊस बांधकाम, तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प आदि कामे या मंडळाकडून केली जाणार आहेत. सातारा जिल्ह्यातील कोयना, कण्हेर, धोम, धोम-बलकवडी (खासगी), कण्हेर कालवा (बीओटी) तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा, दूधगंगा, राधानगरी व इतर संबंधित जिल्ह्यांतील जलविद्युत प्रकल्प हे या मंडळाच्या अधिनस्त राहतील. या जलविद्युत प्रकल्पांतील आस्थापना या मंडळांतर्गत काम करणार आहे.
सातारा प्रकल्प मंडळाकडे असणारे लघु पाटबंधारे विभाग तसेच धोम पाटबंधारे कालवे विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता हे या मंडळाकडे वर्ग केले आहेत. सातारा सिंचन मंडळाकडील दोन धरणे वगळता इतर सर्व मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांची सिंचन व्यवस्था ही सातारा प्रकल्प मंडळाकडे सोपवण्यात आली आहे.
नव्याने झालेल्या पुनर्रचनेनुसार सातारा प्रकल्प मंडळ हे धरणे, कालवे, पोट कालवे बांधणे व देखभाल, दुरुस्ती करणे या कामांसह यापुढे धरणांतील पाण्याचे जलव्यवस्थापनही करणार आहे. प्रकल्प मंडळाच्या अधिनस्त जिहे-काठापूर विभाग, उरमोडी विभाग, धोम-बलकवडी (वाई), कण्हेर विकास विभाग (करवडी) हे विभाग होतेच; मात्र पुनर्रचना झाल्याने सातारा सिंचन मंडळांतर्गत असलेले सातारा सिंचन विभाग व कृष्णा सिंचन विभाग हे सातारा प्रकल्प मंडळात विलीन झाले आहेत. या विभागांचे दोन्हीही कार्यकारी अभियंता प्रकल्प मंडळांतर्गत कामकाज करतील. कोयना व कोळकी वगळता सर्व धरणांचे व्यवस्थापन सातारा प्रकल्प मंडळाकडे आले आहे.