सापांच्या अधिवासाला सर्प तस्करांचा ‘डंख’ 
सातारा

Satara : सापांच्या अधिवासाला सर्प तस्करांचा ‘डंख’

आंतरराज्य रॅकेट सुसाट : माया कमावण्यासाठी मुक्या जनावरांचा केला जातोय वापर

पुढारी वृत्तसेवा

सागर गुजर

सातारा : सातारा जिल्ह्यातील दोघांवर कर्नाटकात कोब्रा साप बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सर्पतस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आर्थिक माया कमावण्यासाठी एका अधिवासात पकडलेल्या सापाला दुसर्‍या अधिवासात नेऊन त्याचे हाल केले जातात. यामध्ये आंतरराज्य टोळी सामील असल्याचे समोर येत आहे. सापांच्या अधिवासाला ‘डंख’ देणार्‍या सर्प तस्करांचा वनविभागाने पर्दाफाश करायला हवा. सर्पमित्राचे ओळखपत्र व दहा लाखांचा विमा देण्याआधी संबंधिताची ‘कुंडली’ तपासणेही तितकेच गरजेचे आहे.

सर्प मित्र हे समाज आणि वन्यजीवांमधला एक मोठा दुवा आहे. ज्याच्या हस्तक्षेपामुळे हजारो सर्पच नव्हे तर सस्तन प्राणी, पक्षी इतकेच नाही तर बर्‍याच वेळेला किटकांचेही संरक्षण करण्याचे काम सर्पमित्र करत असतात. समाजासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून विषारी साप एखाद्याच्या घरात जाऊन पकडणे त्याला सुखरूप पुन्हा निसर्गात सोडणे, हेही जीवावर बेतणारे काम असते. मुक्या जनावराला वाचवण्यासाठी, त्याचबरोबर त्या घरावर आलेल्या संकटाला टाळण्यासाठी स्वतः जीव धोक्यात घालून सर्पमित्र काम करत असतात. कित्येक सर्पमित्रांचा जीवही सर्प चावूनच गेलेला आहे. आज काहींच्या घरामध्ये खायचे सुद्धा वांदे झालेले आहेत, कारण त्या कुटुंबाकडे लक्ष देणारे कोणीच नाही, आणि हेच कारण आहे की शासनाने सर्पमित्रांसाठी दहा लाखांचा विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

एका बाजूला या सगळ्या गोष्टी चांगल्या होत असताना असंख्य प्रमाणात स्वयंघोषित सर्पमित्र आणि अशा छोट्या-मोठ्या संस्था उघडून लोकांसह वनविभागाची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. इतकेच नव्हे तर वन्यजीव संरक्षणाच्या नावाखाली कित्येक बेकायदेशीर कामेही केली जात आहे. काही सर्पमित्र सोशल मीडियावर स्वतःची वाहवा होण्यासाठी प्राण्यांबरोबर सेल्फी काढतात. प्राण्यांना चुकीच्या पध्दतीने हाताळतात. तसेच आपल्या घरामध्ये बाटल्यांमध्ये पकडलेले साप, पक्षी सुद्धा ठेवलेले आहेत, सर्पमित्राच्या नावाखाली बरेचसे सापांची देवाण-घेवाणसुद्धा फार मोठ्या प्रमाणात होते कारण काही राज्यात सापडणारे साप दुसर्‍या राज्यात सापडत नाहीत. त्यामुळे त्या राज्यातले स्वयंघोषित सर्पमित्र दुसर्‍या राज्यातल्या नकली सर्पमित्रांना आपल्याकडचे साप देतात आणि त्या राज्यातले साप आपल्याकडे आणतात. यामधून प्रत्येक सापाचे फोटो काढण्यासाठी वेगवेगळ्या जातीनुसार त्यांची किंमत ठरवली जाते. ज्यांना किंमत मिळत नाही, अशा अशक्त झालेल्या सापांना आपल्या आजूबाजूलाच सोडतात, हे अत्यंत चुकीचे आहे. कारण तो अधिवास या सापांचा नसतो आणि त्या अधिवासात तसेही हे साप मरुनच जातात.

कित्येक वेळा सर्पतस्करी करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पकडले गेलेले आहेत. यांना वनविभागाने पुन्हा या क्षेत्रात प्राण्यांसंदर्भात कोणतेच काम, रेस्क्यू तसेच या क्षेत्रामध्ये प्रत्येक अ‍ॅॅक्टिव्हिटी बंद करण्यास सक्ती केली पाहिजे.
डॉ. अमित सय्यद, वन्यजीव अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT