सातारा : साताऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वतंत्र क्रिकेट स्टेडियम उभारण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील क्रिकेट वर्तुळातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. आजी-माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला पाठिंबा देत स्टेडियम लवकर उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यात, विशेषतः छोट्या शहरांसह ग्रामीण भागात अनेक गुणवंत व होतकरू क्रिकेटपटू आहेत. मात्र, मैदानाअभावी खेळाडूंना सराव तसेच स्पर्धांसाठी अडचणी येत आहेत. क्रिकेट स्पर्धांचे प्रमाण कमी झाले असले तरी खासगी क्लबच्या माध्यमातून स्पर्धा घेतल्या जात आहेत. जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा नियमित घेण्यासही मैदानाअभावी अडचणी येतात. त्यामुळे अनेक खेळाडू केवळ नेट सरावावर समाधान मानत आहेत.
महिला क्रिकेटमध्येही गेल्या काही वर्षांत वाढ झाली असून, अनेक मुलींनी राज्यस्तरावर लक्षवेधी कामगिरी केली आहे. अशा सर्व खेळाडूंना हक्काचे क्रिकेट मैदान उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र स्टेडियम महत्त्वाचे ठरणार आहे. सातारच्या दोन्ही राजांनी यासाठी पुढाकार घेतल्याने हा प्रश्न लवकर मार्गी लागेल, असा विश्वास आजी-माजी खेळाडूंनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला. याशिवाय मिलिंद तळवलकर यांच्यासह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी या निर्णयाचे स्वागत केले असून, स्टेडियम लवकरात लवकर उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
क्रिकेट स्टेडियमची निर्मिती हा चांगला निर्णय आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि ना. शिवेंद्रराजे भोसले यांना जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये समाविष्ट केल्यामुळे स्टेडियम लवकर आकारास येईल. नवीन क्रिकेटपटू आणि जिल्ह्यातील क्रिकेटच्या वाढीस याचा फायदा होईल.-केतन दोशी, माजी रणजीपटू
शहरापासून जवळ प्रशस्त जागेत स्टेडियम झाल्यास त्याचा मोठा फायदा होईल. स्टेडियम केवळ क्रिकेटसाठी असावे. चार-पाच टर्फ विकेट तयार करून मैदानाची उत्तम देखभाल करावी. सातारा पर्यटनस्थळ असल्याने बाहेरील क्रिकेटप्रेमींनाही मोठे सामने पाहण्यासाठी येथे येता येईल.-इसाक सय्यद, ज्येष्ठ खेळाडू
स्टेडियम शहराजवळ झाल्यास लहान खेळाडूंना त्याचा मोठा फायदा होईल. संभाव्य जागा शहराच्या जवळ असल्याने कोणत्याही वयोगटातील खेळाडू रोज सरावासाठी येऊ शकतात. मैदानाची देखभालही योग्य पद्धतीने करता येईल.-ईर्शाद बागवान, सचिव, जिल्हा क्रिकेट असोसिएशन
सातारा जिल्ह्यातील खेळाडूंच्या प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान आवश्यक आहे. चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्यास येथील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तराबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही संधी मिळण्यास मदत होईल.-दीपक कात्रे, ज्येष्ठ खेळाडू
स्टेडियमबाबत गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींमुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. क्रिकेट स्टेडियमची मागणी अनेक वर्षांपासून होती. आता हा प्रश्न मार्गी लागला आहे.-राजू जाधव, खजिनदार, जिल्हा क्रिकेट असोसिएशन
हे क्रिकेट स्टेडियम चांगले होईल, अशी आशा आहे. क्रिकेटसाठी नेहमीच खारीचा वाटा उचलून मावळ्यांची भूमिका पार पाडू.-हेमंत गुजर, ज्येष्ठ खेळाडू